मुंबई - महापालिकेच्या केईएम रुग्णालयात काही दिवसांपुर्वीच 'प्रिन्स' या अडीच महिन्याच्या मुलाचा भाजून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच गर्भपात केलेले भ्रूण मांजरीने खाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.
हेही वाचा - धक्कादायक..! केईएम रुग्णालयात मांजरीने खाल्ले गर्भपात केलेले भ्रूण
हे प्रकरण समोर आल्यानंतर महापौरांनी केईएम रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालयाचे डीन आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापौरांच्या पाहणी दरम्यान रुग्णालय प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. बायोमेडिकल वेस्ट रूममध्ये जमा करण्यात आलेला प्रत्येक अवयव त्यावर लेबल लावून बंदिस्त लॉकरमध्ये ठेवला जातो. असे असताना हा प्रकार घडला कसा, याची प्रत्यक्ष पाहणी करून महापौरांनी माहिती घेतली. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
हेही वाचा - प्रिन्स मृत्यू प्रकरणाचा पारदर्शक अहवाल सादर करा, स्थायी समितीत अध्यक्षांचे आदेश
यापुढे रुग्णालयांना अचानक भेटी देऊन निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर पदावर बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांच्यासह उपमहापौर सुहास वाडकर यांचा सत्कार महापालिका पत्रकार संघटनेकडून करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
हेही वाचा - 'या' कारणामुळे केईएमच्या डॉक्टरने केली आत्महत्या