मुंबई : देशाला सर्वाधिक महसूल देणारे, सर्वाधिक रोजगार देणारे आणि ज्याच्यावर इतर अडीचशे उद्योग अवलंबून असणारे क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र आहे. मात्र कोरोना-लॉकडाऊनचा काळ सुरू झाला आणि गृहप्रकल्पांचे काम बंद झाले. मग मजूर गावी गेले, आर्थिक अडचणी बिकट झाल्या आणि या क्षेत्राचे कंबरडेच मोडले. पण आता मात्र हे क्षेत्र हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने अनेक आर्थिक तरतुदी दिल्याने त्याचाही फायदा होत आहे. अशात दिवाळीनंतर गेलेले सर्व मजूर मुंबई-राज्यात परततील आणि नोव्हेंबर वा डिसेंबर अखेरीस बांधकाम व्यवसायाला अच्छे दिन येतील, अशी आशा बिल्डरांना आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात देशातील सर्वाधिक घरे बांधली जातात. तर, मुंबई-महाराष्ट्रातच सर्वाधिक बांधकाम मजूर आहेत. महाराष्ट्रातच कॊरोनाची दहशत जास्त होती. याची भीती बाळगत मुंबई-एमएमआरमधील 90 टक्के स्थलांतरीत मजूर आपल्या गावी गेले. जूनमध्ये बांधकामाला परवानगी मिळाली खरी. पण काम सुरू करण्यास मजूरच नाही अशी परिस्थिती बांधकाम क्षेत्रात निर्माण झाली. मग बिल्डरांची धाकधुक वाढली. काही बिल्डरांनी तर मजुरांनी परत यावे यासाठी त्यांना रेल्वेच काय तर, काहींनी विमानाचे तिकीटही दिले. पगार वाढून देण्याचीही तयारी दाखवली. पण तरीही कोरोनाच्या भीतीने मजूर मुंबई-महाराष्ट्रात यायला तयार नव्हते.
मात्र आता ऑक्टोबरमध्ये 40 ते 50 टक्के मजूर परतले असून जून-जुलैपेक्षा चांगली परिस्थिती आहे, अशी माहिती क्रेडाई-एमसीएचआयचे सदस्य राजेश प्रजापती यांनी दिली आहे. आता कॊरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. तर रेल्वे सेवा बऱ्यापैकी सुरळीत झाली आहे. तेव्हा परराज्यातून मजूर परतू लागले आहेत. दिवाळीनंतर परिस्थिती आणखी सुधरेल आणि 80 टक्क्यांपर्यंत मजूर परत येईल आणि बांधकामाला वेग येईल, असा विश्वासही प्रजापती यांनी व्यक्त केला आहे.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या हाऊसिंग आणि रेरा कमिटीचे अध्यक्ष आंनद गुप्ता यांनी ही आता परिस्थिती सुधारत असल्याचे म्हटले आहे. मात्र बांधकाम व्यवसायाला अच्छे दिन आणायचे असतील तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी या क्षेत्राला चालना देण्यासाठी आणखी काही सवलती देणे वा तरतुदी करणे आवश्यक आहे. तर महत्वाचे म्हणजे 100 टक्के मजूर आल्याशिवाय काम वेग घेऊच शकत नाही. त्यामुळे या मजुरांना परत आणण्यासाठी सरकारने ठोस प्रयत्न केले तर. नक्कीच दिवाळीनंतर वा डिसेंबर अखेरपर्यंत परिस्थिती पहिल्यासारखी होऊ शकेल, ही आशा आम्हाला आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.