मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे जैन धर्मियांच्या धार्मिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात दोन धर्मगुरूंना आचार्य ही पदवी देखील प्रदान करण्यात आली. आचार्य हे पदवी प्रदान करण्यात आलेल्यांमध्ये जैन समाजाचे धर्मगुरू नयपद्मसागर महाराज आणि प्रशांत सागर महाराज यांचा समावेश आहे. सकाळी आठ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, या मोहोत्सवात महापूजा, भक्तिसंध्या आणि चौविहार असे कार्यक्रम सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून योग गुरु रामदेव बाबा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थिती लावली.
फडणवीस कार्यक्रमात काय म्हणाले?: या कार्यक्रमाला संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज नयपद्मसागर महाराज यांना आचार्य ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व पुज्जनीय संतांचा आशीर्वाद मला एकाच छताखाली घेता येतोय यामुळे मी आनंदी आहे. तसं पाहायला गेलं तर आचार्य ही एक पदवी असली तरी माझ्या मते ती फार मोठी तपश्चर्या आहे. कारण ही आचार्य पदवी मिळाल्यानंतर खरी कसोटी सुरू होते एक तप करावा लागतो करोडो लोकांना आशीर्वाद द्यावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पद्म सागर महाराज हे फक्त एक संत नसून एक दृष्टे व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे समाजासाठी दृष्टिकोन आहे. ते लोकांना धार्मिक मार्गदर्शनासोबतच देशभक्ती देखील शिकवतात. त्यामुळे त्यांच्या इथे गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं." असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका : या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आज पद्मसागर महाराज यांना आचार्य ही पदवी प्रदान करण्यात येते. मी त्यांचा अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. या देशाच्या विकासात, वाटचालीस जैन समाजाचे महत्त्वाची भूमिका राहिली आहे. हे जे नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले ते देखील त्यांच्याच आशीर्वादामुळे स्थापन झाला आहे. इथे आल्यावर मला माहिती मिळाली की पद्मसागर महाराज यांच्या नावावर लाखो किलोमीटर चालण्याचा रेकॉर्ड देखील आहे. त्यांना आज आचार्य ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येतेय त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो."
जैन धर्मीय नागरिक उपस्थित : महालक्ष्मी रेस कोर्सच्या 1लक्ष चौरस फुटांच्या या जागेवर होत असलेल्या या मोहोत्सवाला 1008 जैन धर्म साधू, महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल, न्यायाधीश, आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्यांसह 50 हजारहून अधिक जैन धर्मीय नागरिक उपस्थित असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - Active Covid Cases Rise In India: देशातील सक्रिय कोविड प्रकरणांची संख्या 3,294 वर पोहचली