मुंबई : बोरिवलीत भाजप कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या मारहाणीचे पडसाद आज विधिमंडळामध्ये दिसून आले. या हल्ल्यामागे कोण आहे हे सर्वांना माहीत असून शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे व त्यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरून भाजप अजून किती दिवस मार खाणार, असा उपरोधिक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
दरेकरांनी केली सखोल चौकशीची मागणी : याप्रसंगी बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, काल बोरीवलीत बिभीषण वारे या कार्यकर्त्यावर १९ तलवारीचे वार शरीरावर करण्यात आले आहेत. वारे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला व त्यामुळे त्याच्या प्रवेशाचे फलक विभागात लागल्यावर रात्री दीड वाजता ५० ते ५५ लोकांनी हल्ला केला. त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल होण्यासाठी नेले असता त्यांनी दाखल केले नाही. ३०७ कलम लावले नाही. मी प्रयत्न केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार असताना अशा प्रकारचे हल्ले होणे हे दुर्दैव असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी तसेच गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
सभापतींनी दिले आदेश : दरेकर पुढे म्हणाले की, अशा प्रकारच्या प्रवृत्ती होता कामा नयेत. ज्या वैद्यकीय वारे यांना अधिकाऱ्याने दाखल करण्यास नकार दिला त्याला तत्काळ निलंबित करावे. वरिष्ठ पोलिस अधिकारी व डीसीपी यांनाही निलंबित करावे, अशी मागणी मी केली आहे. सभापतींनी तात्काळ याची दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्यावतीने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल व ५० ते ५५ लोकांना तात्काळ ताब्यात घेण्यात येईल, असे सांगितले आहे.
ठाकरेंचा भाजपला टोला : माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर सडकून टीका केली आहे. काल रात्री भाजप कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणात मारहाण झाली आहे. भाजप किती दिवस असा मार खात राहणार आहे. भाजपची काय मजबुरी आहे, की अजून ते गद्दारांसोबत बसले आहेत, असे सांगत या प्रकरणी अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. मारहाण करणाऱ्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल करून घेतले गेले नाही. यांना फक्त सत्तेत राहून नुसते खुर्चीला चिटकून राहायचे आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
हेही वाचा : Ajit Pawar on State Govt : अवकाळी पावसाच्या नुकसानीवरून अजित पवारांचा सरकारला सवाल, म्हणाले, 'शेतकऱ्यांनी नवीन...'