मुंबई - मुंबईमध्ये शनिवारी (दि. २२ जानेवारी) कमला इमारतीला आग लागून ६ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आज (दि. २३ जानेवारी) कुर्ला येथे एका घराचा काही भाग कोसळून ( Collapsed Part of House ) एका ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला ( Woman Died ) आहे. यामुळे मुंबईमध्ये नेहमीच कोणत्यातरी दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे.
महिलेचा मृत्यू - मिळालेल्या माहितीनुसार एसबी बर्वे मार्ग, आंबेडकर नगर येथील पालिकेच्या अंजुमन इमारतीजवळ सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एका घराचा काही भाग बाजूच्या घरावर कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली एक महिला अडकली होती. तिला मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून कुर्ला नर्सिंग होम या रुग्णालयात दाखल केले. मात्र, या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या मृत महिलेचे नाव लता रमेश साळुंखे असून ती ५३ वर्षाची असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
५ वर्षात ९८७ जणांचा मृत्यू - आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ पर्यंत ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. त्यात ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३ हजार ६६ जण जखमी झाले आहेत.
२०१९ मध्ये १७९ मृत्यू - १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण १३ हजार १५० दुर्घटना घडल्या. यांत १७९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १३२ पुरुष आणि ४७ स्त्रियांचा समावेश आहे तर ७२२ जण जखमी झाले. आग व शॅार्टसर्किटच्या ५ हजार २५४ घटनांमध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला असून २१६ जण जखमी झाले आहेत. घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याच्या १ हजार ३ दुर्घटनांमध्ये ५७ जणांचा मृत्यू झाला असून २९९ जण जखमी झाले. झाडे, झाडांच्या फांद्या पडण्याच्या ४ हजार ९३७ दुर्घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण जखमी झाले. समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडण्याच्या १२८ दुर्घटनांमध्ये ६२ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत.