मुंबई- पवईतील चैतन्य नगर परिसरातील एका चाळीतील घराला आग आगली आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून घरातील सर्व कुटुंब गावी गेल्याने जीवितहानी टळली. तसेच, शेजाऱ्यांच्या प्रसंगवधानाने मोठा अनर्थ टळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीत राहणारे प्रशांत भोगल आपल्या संपूर्ण कुटुंबासह एक महिन्यापूर्वी उस्मानाबादला गेले होते. तेव्हापासून त्यांचे घर बंद अवस्थेत होते. दरम्यान, आज या बंद घरातून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तोडला असता घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्याचे दिसून आले. नंतर स्थानिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला याबाबत कळवले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉटसर्किटने लागली असल्याचा अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे.
स्थानिकांच्या प्रसंगवधानाने टळला मोठा अनर्थ
चैतन्य नगर हा दाटीवाटीचा परिसर आहे. तसेच, भोगल यांच्या घरात गँस सिलेंडर होते. स्थानिकांनी आगीचे लोट दिसताच त्यांनी प्राण पणाला लावत घरात प्रवेश केला. संपूर्ण घरात आग आणि धूर असतानाही स्थानिकांनी पाणी टाकत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच, आगीच्या भक्ष स्थानी असणाऱ्या गँस सिलेंडरला तत्काळ बाहेर काढले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.