मुंबई - मुंबईतील वांद्रे किल्ल्यापासून माहीम किल्लापर्यंत सायकल ट्रक सुरू केला जाणार आहे. हा प्रस्तावित बोर्ड वॉक विविध स्थळांना जोडला जाणार आहे. मुंबईकरांना याची भुरळ पडेल, असा विश्वास राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व प्राधिकरणानी सहकार्य करावे, अशा सूचना केल्या. दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री ठाकरे आज (दि. 26 एप्रिल) आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

महापालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमीत सैनी, पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर या बैठकीला ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बोर्ड वॉकचा आराखडा अन् प्रस्ताव लवकर सादर करा
वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला प्रकल्प सुमारे 4.77 किलोमीटर लांबीचा असेल. पादचारी मार्गिका आणि सायकल ट्रॅक या दोन्ही बाबी यात समाविष्ट असतील. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी देखील हा प्रकल्प आकर्षणाचा भाग ठरणार आहे. या प्रस्तावित बोर्ड वॉकसाठी अंतिम आराखडा आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत, असे निर्देश मंत्री ठाकरे यांनी दिले. तसेच प्राथमिक संकल्पनेवर सर्व संबंधीत यंत्रणांनी चर्चा करुन आपापल्या अखत्यारितील मुद्यांविषयी स्पष्टता करावी. जेणेकरून, अंतिम आराखडा तयार करताना त्यांचा समावेश करता येईल, असे ठाकरे म्हणाले.
अस्थापनांनी समनव्य साधावा
माहीमकडील बाजूस या प्रकल्पाची बांधणी करताना माहीम कोळीवाडा वसाहतीला तसेच तेथील मच्छीमार बांधवांच्या बोटींना कोणताही अडथळा ठरणार नाही, यादृष्टीने हा बोर्ड वॉक बांधण्यात येईल. त्यासोबत वांद्रे-वरळी सागरी सेतू आंतरमार्ग बदलाच्या ठिकाणी (इंटरचेंज) बोर्ड वॉकला अडथळा येणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. संबंधित आस्थापना यंत्रणांनी समन्वय साधून अंतिम आराखडा तयार करावा, अशा सूचना मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
हेही वाचा - राज्यातील अधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार दोन दिवसाचे वेतन