मुंबई - आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकजच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या दीडशे जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दीडशे जणांना मुंबई महानगरपालिकेकडून शोधण्यात आले होते. त्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. असे असतानाही अनेकजणांनी क्वॉरेन्टाईनचा नियम मोडल्याने दीडशे ताबलिगी सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सांताक्रुज, वांद्रे आणि धारावी सारख्या परिसरात रोग संसर्ग पसरवणे, स्वतःबद्दल माहिती लपवणे, असे आरोप लावण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. 6 एप्रिल रोजी मुंबई पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमाला गेलेल्या तबलिगी सदस्यांनी स्वतःहून मुंबई महानगरपालिकेला प्रवासाचा तपशील द्यावा, असे आवाहन केले होते. तबलिगी सदस्यांनी प्रवासाचा तपशील लपवल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिला होता.