मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारीपासून मुंबईत कोरोनाची दुसरे लाट आली आहे. मात्र, ही लाट ओसरत असल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. आज मुंबईमधील रुग्णांची संख्या एक हजारच्या खाली आहे. आज ९८९ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.
हेही वाचा - मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा रेल्वेला फटका, लाखो रुपयांचे नुकसान
रुग्णसंख्या आटोक्यात
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण गेल्या वर्षी ११ मार्चला आढळून आला. या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. मार्च, एप्रिल महिन्यात दरदिवसाला कोरोनाचे ७ ते ११ हजार रुग्णांची नोंद झाली. त्याच दरम्यान राज्यात नाईट कर्फ्यू, विकेंड कर्फ्यू, तसेच १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे मुंबईमधील रुग्णांची आकडेवारी कमी होऊ लागली आहे. आज मुंबईमध्ये १ हजाराहून कमी रुग्ण आढळून आले. आज १८ हजार चाचण्या करण्यात आल्या असून ९८९ रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे कोरोना नियंत्रणात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
न्यायालय, निती आयोगाकडून कौतुक
मुंबई महापालिकेच्या कोरोना व्यवस्थापनाचे सर्वोच्च न्यायालयानंतर आता केंद्र सरकारच्या नीती आयोगानेही कौतुक केले आहे. दुसऱ्या लाटेत सुरुवातीला कोरोनाने कहर केल्याने मुंबईतील स्थिती बिकट झाली होती. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा भासू लागला, त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागला. कोरोना रुग्ण झपाट्याने वाढल्याने पालिकेच्या आरोग्य सेवेवरही प्रचंड ताण आला होता. मुंबई महापालिकेने प्रभावी उपायोजना राबवल्या. रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले. आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीही महापालिका आयुक्तांचे कौतुक केले आहे. बेडचे वाटप, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, शिवाय खासगी रुग्णालयातील बेडचे वाटप करणे, हे सर्व रुग्णांना तातडीने मिळत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणे, तसेच वॉररूम निर्माण करणे हे मुंबईचे कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे, असे निती आयोगाने म्हटले आहे.
अशी वाढली रुग्णसंख्या
गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 21 मार्चला 3775, 26 मार्चला 5513, 28 मार्चला 6923, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर रुग्णसंख्येत घाट होत आली आहे. 7 एप्रिलला 10428, 11 एप्रिलला 9989, 19 एप्रिलला 7381, 28 एप्रिलला 4966, 29 एप्रिलला 4192, 30 एप्रिलला 3925, 1 मे 3908, 2 मे 3672, 3 मे 2662, 4 मे 2554, 5 मे 3879, 6 मे 3056, 7 मे 3039, 8 मे 2678, 9 मे 2403, 10 मे 1794, 11 मे 1717, 12 मे 2116, 13 मे 1946, 14 मे 1657, 15 मे 1447, 16 मे ला 1544 तर 17 मे ला 1240 नवे रुग्ण आढळून आले. यावरून रुग्णसंख्येत घट होत असल्याचे दिसते.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचे राईट हँड प्रताप सरनाईक फरार; किरीट सोमैयांचा आरोप