मुंबई - विजेच्या बचतीसाठी सर्वत्र एलईडी दिवे लावावेत, असे आदेश केंद्र सरकारने दिले होते. याला पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने विरोध केला होता. मात्र, हा विरोध मावळल्यावर मुंबईच्या रस्त्यांवरील तब्बल ९५ टक्के दिव्यांचे 'एलईडी'मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. ( LED Lights in Mumbai ) मुंबई महापालिकेचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून त्यामुळे ५२ टक्के विजेची बचत झाली आहे. ( BMC on LED Lights ) वीज कंपन्यांना अनुदानित आणि विनाअनुदानित पद्धतीने दर देण्यात आले असून त्यानुसार ही कंत्राटे देण्यात आली आहेत.
एलईडी दिवे बसवण्याचे आदेश -
पारंपरिक वीज यंत्रणा आणि दिव्यांमुळे वीजेचा बेसुमार वापर होत असल्याचा दावा करत केंद्र सरकारने सन २०१५ मध्ये देशभरातील सर्वच सरकारी कार्यालये आणि कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात एलईडी दिवे बसवण्याचे आदेश दिले होते. त्य़ानुसार वीज धोरणात या बाबीचा समावेश देखील करण्यात आला आहे. एनर्जी एफिशियन्सी सर्विस या कंपनीला मुंबईतील दिवाबत्तीच्या खांबावर एलईडी दिवे बसवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मरीन ड्राईव्ह येथील राणीच्या रत्नहारापासून (क्वीन नेकलेस) या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. येथील पारंपारिक सोडियम व्हेपरचे दिवे काढण्यात आले. त्यामुळे तेथे एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र याला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. यावेळी वादही रंगला होता. मुंबईत बेस्ट ही सरकारी कंपनी असताना केंद्र सरकारने शिफारस केलेली योजना मुंबईत न राबविण्याचे ठरवण्यात आले होते.
शिवसेनेचा विरोध मावळला -
मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावरील एलईडी दिवे काढून पूर्वीचे सोडियम व्हेपरचे दिवे बसवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणून ते दिवे बदलण्यातही आले होते. मात्र शिवसेनेचा हा विरोध कालांतराने मावळला. त्यानंतर पालिका प्रशासनाने मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील दिव्यांचे एलईडीमध्ये रूपांतर केले आहेत. त्यामुळे सरासरी विद्युत एनर्जी युनिटमध्ये ४७ टक्के तर विद्युत बिलामध्ये ५२ टक्के इतकी बचत झाल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फक्त पाच टक्के पारंपरिक दिव्यांचे एलईडीमध्ये रूपांतर करण्याचे काम बाकी आहे. हे काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार असल्याचा दावा पालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाने केला आहे. याबाबतच्या कंत्राटाला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रशासनाने सात मार्च रोजी स्थायी समितीत याबाबत सादर केलेल्या प्रस्तावात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा - Covid Fourth Wave : भारतात 'या' महिन्यापासून येणार कोरोनाची चौथी लाट.. टास्क फोर्सची उद्या बैठक
सर्वाधिक दिवे अदानी कंपनीकडे -
मुंबई शहरात बेस्ट, पूर्व आणि पश्चिम उपनगरात अदानी आणि भांडुप व मुलुंड परिसरात महावितरणकडे हे काम सोपवण्यात आले आहे. सोडियम व्हेपर ते एलईडी दिव्यांचे रूपांतर, देखभाल, परिरक्षण यासाठी संबंधित कंपन्यांना पालिका भाडे देते. मागील सहा वर्षापासून याबाबतचे कंत्राट सुरू आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात अदानी वीज कंपनीकडे सर्वाधिक वीज ग्राहक तसेच कंपनीमार्फत वीजपुरवठा केला जातो. या कंपनीला सुमारे ८७ हजारांहून अधिक दिवे रुपांतरीत करण्याचे काम देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.