मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असताना मुंबई शहरात आचारसंहिता काळात काळ्या पैशांवर पोलीस प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. यातच बोरिवली रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल साडेसात कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला वाढता विरोध, भूमिपुत्रालाच संधी देण्याची मागणी
मंगळवारी रात्री उशिरा मुंबई सेंट्रल स्थानकातून निघालेली गुजरात मेल बोरिवली स्थानकात पोहोचताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी या गाडीतील एस ५ व एस ६ या डब्यात छापा मारला. यावेळी तब्बल ३५ बॅगांची तपासणी केली असता यात १२ लाख रुपयांची रोकडसह सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने पोलिसांना मिळून आले. या संदर्भात पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेऊन जप्त केलेले जवळपास साडेसात कोटींचा मुद्देमाल आयकर विभागाच्या क्यूआरटी विभागाला वर्ग केला आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; रोहित पवारांचा समावेश
मुंबईतील रेल्वे स्थानके, बसस्थानके यांच्यासह महत्वाच्या विमानतळांवर मिळालेल्या माहितीच्या आधारावरून कारवाई केली जात आहे. आयकर विभागाकडून आता पर्यंत ४ कोटींची बेनामी रोख रक्कम जप्त करण्यात आली असताना बोरिवली रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल साडेसात कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची ही रक्कम बेनामी आढळून आली असल्याने याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.