मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यातील भायखळा भागात निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाद्वारे 58 लाख 58 हजार 15 रुपये इतकी संशयित रक्कम पकडण्यात आली आहे. तर धारावी मतदार संघात 4 लाख 51 हजार 740 रुपये अशी एकुण 63 लाख 9 हजार 755 रुपयांची संशयास्पद रक्कम मिळाल्याची माहिती मुंबई शहर विभाग निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - नाशकात शिवसेना नेत्याने घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची भेट; उलट-सुलट चर्चेला उधाण
भायखळा विधानसभा मतदार संघात के.के. टॉवरच्या समोर, के.के.रोड, भायखळा (पश्चिम) येथे गुरूवारी सायंकाळी वाहन (क्र. MH.46, BF.9849) या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनाची निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाद्वारे तपासणी केली. यावेळी वाहनात 58 लाख 58 हजार 15 रुपये इतकी संशयीत रक्कम आढळून आली. यानंतर ही रक्कम आग्रीपाडा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली. तसेच आयकर विभाग कार्यालय मुंबईचे अतिरिक्त संचालक यांना याबाबत कळविण्यात आल्याची माहिती भायखळा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक क्षीरसागर यांनी दिली.
हेही वाचा - जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना थारा देऊ नका, प्रणिती शिंदेंचे मतदारांना आवाहन
तर धारावी विधानसभा मतदारसंघात आज सायन जंक्शनकडून एलबीएस रोडने कुर्ल्याच्या दिशेने जाणारे (वा. क्र. MH-01-BK-1961) या होंडा सिटी कार या वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनात 4 लाख 51 हजार 740 रुपये इतकी संशयित रक्कम आढळून आली. याबाबत धारावी पोलीस स्टेशनमध्ये (25/2019) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती धारावी (अ.जा.) विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.