मुंबई : मुंबईत रेल्वेला नागरिकांची जीवनवाहिनी म्हटले जाते. या जीवन वाहिनीवर कुर्ला पर्यंत सहा ट्रॅक आहेत. मात्र कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावरच हे ट्रॅक असल्याने प्रवाशी वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. कुर्ला ते सीएसएमटी मार्गावरील धारावीतील दोन भूभाग मुंबई महापालिकेकडून रेल्वेला हस्तांतरित केले जाणार आहेत. यामुळे कुर्ला ते सीएसएमटी मार्गावर पाचवी आणि सहावी मार्गिका उभारणे सोपे जाणार आहे.
प्रवासात होतो उशीर : मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून कर्जत कसारा या मार्गावर मध्य रेल्वे तर पनवेल पर्यंत हार्बर रेल्वे चालवली जाते. मुंबईमध्ये येण्यासाठी बहुतेक ठिकाणी अनेक मार्गिका असल्याने कुर्ला पर्यंतचा प्रवास अडचणींचा ठरत नाही. कुर्ला पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत चार मार्गिका असल्याने स्लो आणि फास्ट ट्रेन त्यावर चालवल्या जातात. याच मार्गावर मेल एक्स्प्रेस चालवल्या जातात. यामुळे कुर्ला पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत मेल एक्स्प्रेस गेल्यास लोकलचा खोळंबा होतो. यामुळे प्रवाशांना प्रवासात उशिर होतो.
धारावीतील जागेमुळे काम रखडले : कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवास करताना सायन आणि माटुंगा स्टेशनमध्ये धारावी ही आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी आहे. या झोपड्पट्टीची काही जागा पाचवा आणि सहावा मार्ग उभारण्यासाठी रेल्वेला लागणार आहे. ही जागा मिळावी यासाठी रेल्वे अनेक वर्षे प्रयत्न करत होती. हे दोन भूखंड महापालिकेने हस्तांतरीत करावेत यासाठी ९ मार्च २०२० रोजी रेल्वे प्राधिकरणाने पालिकेला पत्र पाठवले होते. परंतु कोविडची लाट आल्याने यावरील पुढील कार्यवाही थांबली होती.
५ व्या व ६व्या मार्गिकेचा मार्ग मोकळा : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज ते कुर्ला या ५ व्या व ६व्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी धारावीतील ७२३ चौरस मीटर क्षेत्रफळाची आवश्यकता आहे. या जागेवर महापालिकेच्या भाडेकरुंची इमारत असून लक्ष्मीबाग येथील निवासी इमारत बाधित होत आहे. येथील २४ भाडेकरूंचे पुनर्वसन रेल्वे प्राधिकरण हे एमएमआरडीएच्या माध्यमातून करणार आहे. हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी रेल्वे प्राधिकरण महापालिकेला ६ कोटी ३५ लाख रुपये मोजणार आहे. त्याबदल्यात धारावीतील ७२३ चौरस मीटरची जागा रेल्वेला हस्तांतरीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे ५ व्या व ६व्या मार्गिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.