मुंबई: राज्यात आज ५६२ रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात ठाणे, नांदेड, सांगली येथे प्रत्येकी एक असे तीन मृत्यू झाले आहेत. आज ३९५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८१ लाख ४५ हजार ३४२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७९ लाख ९३ हजार ४१० रुग्ण बरे झाले आहेत. तर १ लाख ४८ हजार ४४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ३४८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत १७२ रुग्ण: मुंबईत आज १७२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा ११ लाख ५७ हजार ४५४ वर पोहचला आहे. मुंबईत गेले काही दिवस एकही मृत्यू झाला नसल्याने मृत्यूचा आकडा स्थिरावला आहे. मुंबईत एकूण १९ हजार ७४७ मृत्यू नोंद झाले आहेत. ११ लाख ३६ हजार ६३७ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या १०७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ८३ रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यापैकी २५ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार: मार्च पासून पुन्हा कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. ३० मार्चला ६९४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात किंचित घट होऊन ३१ मार्चला ४२५ रुग्णांची नोंद झाली होती. १ एप्रिलला वाढ होऊन ६६९ रुग्णांची नोंद झाली. २ एप्रिलला ५६२ रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्य सरकार सज्ज : राज्यात सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर या सहा जिल्ह्यात पॉजीटिव्हीटी रेट वाढला आहे. रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने कोविड १५८९ रुग्णालयांमध्ये ५१३८० आयसोलेशन खाटा तसेच ४९८८९ ऑक्सीजन बेड, १४४०६ आय. सी. यू. बेड आणि ९२३५ व्हेंटीलेटर्स सज्ज ठेवली आहेत. ऑक्सिजनची कमी पडणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे.
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प धुळखात: नाशिक शहरसह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने नााशिक महापालिकेने शहरातील सर्व कोव्हिड सेंटरबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कोव्हिड सेंटरसाठी उभारण्यात आलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प भांडारगृहात जमा केले जाणार आहेत. मात्र, सध्या जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्रकल्प धूळखात पडून आहे.