मुंबई: दिंडोशी पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी एपीआय सूरज राऊत यांना गोकुळ धाम परिसरात एक व्यक्ती गांजा विकत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचला तेव्हा एक व्यक्ती गोकुळधाम येथे गांजा विक्रीसाठी आल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्याच्याकडून ५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी तपास केला असता, अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील एका गोदामातून गांजाची तस्करी केली जाते असे समोर आले. पोलिसांनी पथकासह तेथे छापा टाकला तेथून सुमारे २३ किलो गांजा जप्त केला आहे.
गोदाम चालवणारा व्यक्ती मूकबधिर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना अटक केली आहे. तसेच दोन महिलांना समन्स बजावण्यात आले आहेत.अश्रफ सय्यद (३०) महेश शांतीलाल बिंद ३३ मोबीन मेहबूब सय्यद (२५) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत ते सर्व संतोष नगर परिसरातील रहिवासी आहेत. मुख्य आरोपी अशरफ सय्यद याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.