मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मुंबईत या विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने मुंबई हा कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरला आहे. मुंबईत ज्या विभागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत अशा प्रतिबंधित विभागाच्या संख्येत गेल्या 20 दिवसात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 20 दिवसांपूर्वी मुंबईत 146 प्रतिबंधित क्षेत्र होती त्यांची संख्या आता 452वर पोहोचली आहे.
जगभरात कोरोनाचे रुग्ण नोव्हेंबर महिन्यापासून समोर येत आहेत. मुंबईत या विषाणूचे रुग्ण 12 मार्चपासून समोर येऊ लागले आहेत. सुरुवातीला या विषाणूचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत होते. मात्र, एप्रिल महिना सुरू होताच रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. त्यावेळी मुंबईत ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत त्या विभागाला 'कंटेनमेंट एरिया' म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुंबईत एप्रिलच्या सुरुवातीला असे 146 प्रतिबंधित क्षेत्र होती. 3 एप्रिलला त्यात वाढ होऊन 241, 9 एप्रिल 381 तर सध्या मुंबईत 452 प्रतिबंधित क्षेत्र झाली आहेत.
मुंबईमध्ये बहुसंख्य ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र आहेत. अशा विभागांमधून इतर ठिकाणच्या नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची भीती असल्याने येथील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर ये-जा करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मुंबईत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा 2120 वर पोहोचला असून मृतांची संख्या 121वर पोहोचली आहे.
मुंबईत आतापर्यंत 239 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत 5 ते 16 एप्रिलदरम्यान कोरोना रुग्ण आढळून आलेल्या विभागात म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अती आणि कमी जोखमीच्या 57 हजार 700 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 16 एप्रिलला 16 हजार 368 व्यक्तिंनी 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे.