मुंबई - लॉकडाऊन काळात राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी, राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आतापर्यंत 385 विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहे. या गाड्यांमधून आतापर्यंत 5 लाख परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. एका व्हिडिओ संदेशाद्वारे देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा संपूर्ण खर्च हा फक्त राज्य शासनाने केला असल्याचे सांगितलं.
मुंबई पोलिसांवर शहरात अडकलेल्या मजुरांच्या प्रवासाच्या नोंदणीची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलिसांकडे नोंदणी करणाऱ्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यासाठी, पोलीस त्यांना फोन करून संपर्क साधत आहेत. यामुळे विनाकारण नोंदणी न केलेल्या मजुरांनी रेल्वे स्थानकावर गर्दी करू नये, असे आवाहन अनिल देशमुख यांनी परप्रांतीय मजुरांना केलं आहे.
मुंबई पोलिसांवर मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची जवाबदारी देण्यात आली असून त्यांच्यावरचा असलेला प्रचंड ताण लक्षात घेता मुंबईतील 93 पोलीस ठाण्याच्या मदतीसाठी मंत्रालयातील 40हून कमी वय असलेल्या 1500 कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितलं.
दरम्यान, मंगळवारी मुंबईच्या वांद्रे स्टेशन परिसरात आपापल्या गावाला जाण्यासाठी परप्रांतीयांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे पोलिसांना नाईलाजास्तवर सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवावी लागली होती.
हेही वाचा - मुंबईतील कुकरेजा पॅलेस सोसायटीत समोसा पार्टीचे आयोजन; दोघांंना अटक
हेही वाचा - आरएसएसकडून प्रशासनाला मदतीकरिता 'वन वीक फोर द नेशन' अभियान, नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन