मुंबई : गरोदर मातेच्या हृदयाला छिद्र असल्यामुळे 27 आठवड्यांचा गर्भपात करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. या गरोदर महिलेचा 27 आठवड्यांचा गर्भपात यशस्वीपणे करण्यात केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. या गरोदर महिलेचा गर्भपात यशस्वी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेचे वकील सागर पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
पती पत्नी राहत होते सेलवासला : ही गरोदर महिला पतीसोबत केंद्रशासित प्रदेश असलेल्या सेलवास येथे राहते. या गरोदर महिलेच्या हृदयाला छिद्र असल्याची माहिती गर्भधारणा झाल्यानंतर तब्बल 27 आठवड्यांनतर मिळाल्याने दोघांनी मुंबईत धाव घेतली. गरोदर महिलेची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत होती, त्यांच्या आहाराची काळजीही घेतली जात होती. मात्र गर्भधारणा होऊन 27 आठवडे झाल्यानंतर त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर ही बाब उघड झाली. त्यामुळे डॉक्टरांनी मुंबईत जाऊन उपचार करण्याचा सल्ला दिला.
हृदयाला छिद्र असल्याने माता आणि बाळाला धोका : मुंबईत तपासणी केल्यानंतर गरोदर महिलेच्या हृदयाला बारीक छिद्र असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यामुळे या दोघांनी केईएम रुग्णालयात धाव घेतली. मात्र गरोदर महिलेच्या हृदयाला छिद्र असल्यामुळे बाळ आणि मातेच्या जीवाला धोका असल्याची माहिती त्यांना डॉक्टरांनी दिली. त्यामुळे केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी हे प्रकरण मुंबई महापालिकेकडे सोपवले. त्यानंतर गरोदर महिलेच्या गर्भपातासाठी मुंबई उच्च न्यायालयात जुलै महिन्यात अर्ज दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने समिती नेमण्याचे दिले आदेश : मुंबई महापालिकेने याबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणी 11 डॉक्टरांची एक समिती नेमली. या समितीने तातडीने महिलेची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या डॉक्टरांच्या पथकाने आईचा जीव वाचवण्यासाठी 27 आठवड्यांचा गर्भपात करणे आवश्यक असल्याचा अहवाल दिला. डॉक्टरांच्या शिफारसीनंतर न्यायमूर्ती गौतम पटेल, न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने 3 ऑगस्टला गरोदर महिलेचा गर्भपात करण्याचा निर्णय दिला.
केईएम रुग्णालयात पार पडली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया : न्यायालयाने दिलेल्या वैद्यकीय निर्देशांचे पालन करत केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन 27 आठवड्याचा गर्भपात करत गरोदर मातेचा जीव वाचवला. हा गर्भपात यशस्वी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेचे वकील सागर पाटील यांनी न्यायालयात सादर केली. अर्जदाराच्या वतीने वकील रुबिना गोंसालविस यांनी बाजू मंडली. मुंबई उच्च न्यायालयाने महिलेच्या आरोग्य स्थितीची माहिती घेऊन योग्य ते उपचार करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले आहेत. 24 आठवड्यांहून अधिक काळ लोटल्यास गर्भवती महिलेला गर्भपात करणे हे बेकायदेशीर आहे. अपवादात्मक परिस्थितीत न्यायालयाकडून गर्भपाताला मंजुरी देण्यात येते.