मुंबई: मुंबईसह देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या जी २० परिषदेसाठी ( G 20 Summit 2022 ) राज्य सरकारने तयारीचा वेग वाढविला आहे. या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण १४ बैठका होणार असून त्यातील ८ बैठका या मुंबईत पार पडणार आहेत. त्याशिवाय पुण्यात ४ तर नागपूर आणि औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. यापैकी १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत मुंबईत पहिली बैठक होत असून या बैठकीत येणाऱ्या जी - २० सदस्य देशांच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी वैद्यकीय सुविधांसाठी मुंबईत जे जे रुग्णालयाच्या २० टीम तैनात करण्यात येणार आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश: जी-२० परिषद पुढील वर्षी भारतात होणार आहे. मात्र, त्यानिमित्ताने वर्षभर विविध शहरांमध्ये महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत जी-२० सदस्य देशांच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मुंबईत येणार आहेत. त्यांच्या वैद्यकीय सुविधांसाठी जे. जे. रुग्णालयाच्या माध्यमातून २० पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. आंतराष्ट्रीय स्तरावरील बैठकांच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांतून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती देशात येतात, त्यावेळी राजशिष्टाचार विभागातर्फे त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते. त्यात वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असलेल्या पथकाचाही समावेश असतो. विदेशी पाहुणे मुंबईतून बाहेर जाईपर्यंत ही पथके त्यांच्यासाठी तैनात असतात.
१०८ क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्स: वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, १०८ क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्स या कामासाठी वापरण्यात येणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वैद्यकीय पथके तयार करणे, हे जे. जे. रुग्णालयाच्या प्रशासनासाठी नित्याचे काम आहे. याप्रकरणी, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर म्हणाले की, ‘यासंदर्भात जे. जे. रुग्णालय प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत.’
कुठल्या पद्धतीच्या पथकांचा समावेश: जी-२०च्या निमित्ताने होणाऱ्या डेव्हलपमेंट वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या वैद्यकीय पथकांत भूलतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका, एक ॲम्ब्युलन्स, वाहक, सहायक आदींचा समावेश असेल. अशी २० पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक पथकाला आठ तासाचे काम असेल. प्रत्येक पथकासोबत काही महत्त्वाची औषधे असतील. एखादा वैद्यकीय आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्यासाठी ही पथके काम करतील. ज्या ठिकाणी व्हीआयपी पाहुणे बैठकीसाठी उपस्थित असतील वा जिथे त्यांचा निवास असेल तिथेच ही पथके तैनात असतील.
सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन: या बैठकांच्या निमित्ताने महाराष्ट्रात येणाऱ्या तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईतही वांद्रे वरळी सी लिंक, गेटवे ऑफ इंडिया, सीएसएमटी, वांद्रा कुर्ला संकुल, चर्चगेट स्थानक आणि मुंबई विमानतळावर रोषणाई करण्यात येणार आहे.