मुंबई- मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांनंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज मुंबईत २ हजार ६५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, २ हजार ६६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
४६ मृत रुग्णांपैकी ३८ रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये २९ पुरुष तर १७ महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाख ५ हजार १४२ वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा ८ हजार ९२६ वर पोहोचला आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा १ लाख ६९ हजार २६८ वर गेला आहे. सध्या मुंबईत २६ हजार ५४० सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६६ दिवस, तर सरासरी दर १.५ टक्के आहे.
हेही वाचा- कोकणातील अनेक नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले स्वागत
मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या ६६५ चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच, १० हजार ४५० इमारती व इमारतींच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी ११ लाख १५ हजार ७११ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा- आरे वृक्षतोड : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश