मुंबई : अश्लील एमएमएसद्वारे एका महिला व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी आली असून फुल ऍण्ड सेटलमेंटसाठी दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. फुल ऍण्ड सेंटलमेंटसाठी दोन कोटीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जोगेश्वरीत घडली आहे. या आरोपींमध्ये मित्राच्या पत्नीसह सहकार्याचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लग्नासाठी केले प्रपोज : या आरोपींमध्ये तक्रारदार महिलेच्या मित्राच्या पत्नीसह त्याच्या सहकार्याचा समावेश असून लवकरच या दोघांची चौकशी करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 38 वर्षांची तक्रारदार महिला जोगेश्वरी परिसरात तिच्या पती, तीन मुलांसोबत राहते. तिच्या पतीची रिफायनरी, फार्मास्टिकल कंपनी असून याच कंपनीत ती उपाध्याक्ष म्हणून काम पाहते. ती मूळची मध्यप्रदेशच्या भोपाळची रहिवाशी असून मार्च 2021 रोजी ती तिच्या माहेरी गेली होती. तिथेच तिची धर्मेद्र मिश्राशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. काही दिवसांनी धर्मेद्रने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तो तिच्या पत्नीला घटस्फोट देणार आहे असून तिनेही तिच्या पतीला घटस्फोट द्यावा. त्यानंतर आपण लग्न करु असा प्रस्ताव त्याने तिच्याकडे ठेवला होता. मात्र, तिने त्यास नकार देत त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. या घटनेनंतर त्याने तिची माफी मागून मैत्री कायम ठेवण्याची विनंती केली होती. तिनेही नंतर त्यास होकार दिला होता. एप्रिल महिन्यांत तिने धर्मेंद्रची पत्नी मोनिका मिश्रा हिला हा प्रकार सांगितला होता. त्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाले होते.
लैगिंक अत्याचार : याच दरम्यान धर्मेंद्र तिच्या घरी आला आणि त्याने ज्यूसमधून तिला गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर त्याने तिच्यासोबत लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील व्हिडीओ बनविले होते. ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करीत होता. तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने तिच्या पतीसह मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. धर्मेंद्र हा सतत तिच्याकडे सतत पैशांची मागणी करीत होता. पैसे दिले नाहीतर तिचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी मोनिका, तिचे वडिल ओमप्रकाश तिवारी, भाऊ देवांग त्रिवेदी यांनीही तिला न्यूड फोटो, व्हिडीओ पाठवून तिच्याकडे पैशांची मागणी केली होती.
खंडणीसाठी धमकी : बदनामीच्या भीतीने या चौघांना तिने आतापर्यंत तीन कोटी रुपये दिले होते. तरीही तिला ते सर्वजण ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देत होते. मुंबईत आल्यानंतर त्याने तिला पुन्हा भोपाळ येथे येण्यास प्रवृत्त करुन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. प्रत्येक वेळेस त्याने तिचे अश्लील व्हिडीओ बनविले होते. इतकेच नव्हे तर तिचा गळा आवळून तिच्यावर हल्ला केला होता. हल्ल्याची माहिती तिच्याकडून तिच्या कुटुंबियांना समजण्यापूर्वी त्याने मोनिका, ओमपकाश आणि देवांगच्या मदतीने तिच्या घरात घुसून तिच्यावर दुसर्यांदा बॅट, हॉकीस्टिकने प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर तिने मध्यप्रदेशच्या टिटी पोलिसांत या चौघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम 294, 323,325, 506 आणि 452 अन्वये गुन्हा नोंदविला होता.
दोन कोटींची मागणी : धर्मेंद्रसह इतरांकडून होणार्या मानसिक, शारीरिक तसेच ब्लॅकमेलसह खंडणीसाठी दिल्या जाणार्या धमकीनंतर तिने तिच्या पतीला घडलेला प्रकार सांगितला होता. या प्रकारानंतर त्यांनी शामला हिल्स पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दुसरी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर धर्मेंद्रसह इतर तिघांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह खंडणीसाठी धमकी देल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या तक्रारीनंतर ही महिला मुंबईत निघून आली होती. 25 फेब्रुवारीला ती पवईतील एका मॉलमध्ये मुलांना कपडे आणण्यासाठी गेली होती. तिथे एक तरुण आला आणि त्याने मोनिका तिवारीने त्याला तिथे पाठविले होते. तिचे अश्लील एमएमएस दाखवून त्याने तिच्याकडे दहा लाखांची मागणी केली. तसेच फुल ऍण्ड फायनल सेंटलमेंट म्हणून तिने दोन कोटी दिल्यास तिचे सर्व एमएमएस डिलीट करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली. तिने मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोनिका मिश्रा ऊर्फ तिवारीसह दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हानंतर एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच मोनिकासह तिच्या सहकार्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.