मुंबई : संगीत क्षेत्रात रॅप या कलेचा जन्म मुळात विद्रोहासाठी झाला. रॅप हे एक विद्रोही संगीत माध्यम आहे. तुमच्या ज्या काही भावना आहे, खंत आहे. ती या रॅप प्रकारातून तुम्ही अधिक प्रखरपणे मांडू शकता. आज घडीला तुम्ही अनेक प्रसिद्ध रॅप गायकांची गाणी ऐकली असतील. मात्र, यात प्रेम, मनोरंजन हेच फार दिसते. मुंबईतील गोवंडी सारख्या झोपडपट्टी भागामध्ये राहणारी तरुणी मात्र आपल्या रोजच्या जगण्यातील समस्या, तिच्या अडचणी ती तिच्या रॅपमध्ये मांडते. तिचे सामाजिक विषयांवरचे हे विद्रोही रॅप अनेक वेळा स्थानिक भागात चर्चेचा विषय ठरतात.
16 वर्षाची रॅपर सानिया : मुंबईतील या विद्रोही रॅपर तरुणीचे नाव सानिया मिस्त्री कयीमुद्दिन आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी प्रमाणेच एक झोपडपट्टी एरिया अशी गोवंडी भागाची ओळख आहे. अशा भागात सानिया राहते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली सानिया केवळ सोळा वर्षाची आहे. सानिया सध्या तिच्या भागात स्टार बनली आहे. सानिया सध्या बारावीत आहे. बारावीच्या परीक्षेची तयारी आणि सोबतच आपल्या रॅप गायनाचा छंद जोपासणे, ही दोन्हीही काम सानिया अगदी सहज पार पाडते. यात आपल्याला आनंद मिळत असल्याचे सानिया सांगते.
कशी वळली रॅप गायनाकडे : आपल्या या प्रवासाबाबत ईटीव्हीशी बोलताना सानियाने सांगितले की, आमच्या शाळेत अनेक जण रॅप ऐकतात. आमच्या ग्रुपमध्ये काहीजण रॅप ऐकत होते. त्यावेळी मी सहज म्हणाले हे काय ऐकता हे खूप सोपे आहे. मला कविता लिहिण्याचा सुद्धा छंद आहे. रॅप करण्याआधी मी कविता लिहायचे. त्यामुळे मी माझ्या मित्रांना रॅप हे कविते सारखेच असतात असे म्हणाले. यावर माझ्या मित्रांनी माझी खिल्ली उडवली आणि मला एक रॅप बनवायला सांगितला. मी त्यांना रॅप बनवून ऐकवला, त्यावेळी त्यांना माझे म्हणणे पटले. सोबत काही माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांनी मात्र मला सांगितले तू जे काही म्हटले ते खूप छान होते. तू अशीच आणखी गाणी तयार कर आणि तिथून माझा कवितेकडून गायनाकडे प्रवास सुरू झाला.
रोजच्या आयुष्यावर रॅप लिहिते : पुढे बोलताना सानियाने सांगितले की, गरिबी काय असते हे मी खूप जवळून पाहिलेले आहे. आजही आम्ही त्याच परिस्थितीमध्ये जगत आहोत. माझ्या आजूबाजूची परिस्थिती देखील काही वेगळी नाही. माझे मित्र-मैत्रिणीचे देखील याच स्थितीतून जात आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काही घडले, मी आजूबाजूला जे काही बघते, अनुभवते. तेच मी माझ्या गाण्यांमध्ये लिहिते. माझे वडील रिक्षा चालवतात. आई मजुरी करते. माझ्या आई वडिलांची मेहनत मी रोज बघते. ते आमचे घर कसे चालवतात? माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते काय मेहनत घेत आहेत, हे मी रोज अनुभवते आणि हेच माझे निरीक्षण मी माझ्या रॅपमध्ये लिहिते.
साहित्य क्षेत्रात करिअर करायचंय : सानियाने सांगितले की, तिने आत्तापर्यंत काही सामाजिक संस्थांसाठी मदत म्हणून रॅप लिहिले आहेत. कोरोना काळात जेव्हा लोक कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला घाबरत होते. यावर देखील तिने एक रॅप लिहिला. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सानियाने मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकासाठी देखील एक रॅप दिला. त्यामुळे निर्भया पथकाने सानियाचा सन्मान देखील केला आहे. सध्या सानिया युनिसेफ या जागतिक संस्थेसाठी एक रॅप बनवत असून यावर तिचे काम सुरू आहे. भविष्यात सानियाला लेखन, कविता आणि रॅप अशा साहित्याच्या क्षेत्रात आपले करिअर घडवायचे आहे.
हेही वाचा : Addiction Holi Program : होळीनिमित्त व्यसनाचे दहन; नशाबंदी मंडळाचा अनोखा उपक्रम