मुंबई- शहरात रोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वरळीमधील झोपडपट्टी विभागात कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यानंतर धारावीमधील झोपडपट्टी विभागात रुग्णांची संख्या वाढत आहे. धारावीत १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी कोरोना रुग्णांच्या सहवासात आल्याने ९ जणांना कोरोनाच विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. धारावीत आता पर्यंत कोरोनाचे ४३ रुग्ण आढळले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे, वरळीनंतर धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. धारावीत डॉ. बलिगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर, मदिना नगर, धनवाडा चाळ, सोशल नगर, जनता कॉलनी, कायलन वाडी, पीएमजीपी कॉलनी, मुर्गन चाळ आदी भागात तसेच दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले तबलिगी समाजाचे लोक यांचा कोरोनाबाधित रुग्णांमध्ये समावेश आहे.
धारावीत आतापर्यंत डॉ. बालिगा नगरमध्ये २, सोशल नगरमध्ये १ आणि कायलन वाडी येथे एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, धारावीतील मृतांचा आकडा ४ वर पोहोचला आहे. धारावीत अत्यंत दाटीवाटीच्या झोपड्या असल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे, माहीम फाटक, आंध्रा वॅली रोड, धारावी माहीम रोड, धारावी क्रॉस रोड, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, कटारिया मार्ग, एकेजी नगर, मदिना नगर, चित्रनगरी आदी भाग प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे.
कुठे किती रुग्ण
डॉ बलिगा नगर- ५ रुग्ण ( २ मृत्यू), वैभव अपार्टमेंट- २ रुग्ण, मुकुंद नगर- ९ रुग्ण, मदिना नगर- २ रुग्ण, धनवाडा चाळ- १ रुग्ण, मुस्लिम नगर- ५ रुग्ण, सोशल नगर- ६ रुग्ण ( १ मृत्यू ), जनता सोसायटी- ४ रुग्ण, कायलान वाडी- २ रुग्ण (१ मृत्यू), पीएमजीपी कॉलनी- १ रुग्ण, मुर्गन चाळ- १ रुग्ण, राजीव गांधी चाळ- १, शास्त्री नगर- १ रुग्ण.
हेही वाचा- मानखुर्दमध्ये कोरोना रेपोर्ट निगेटिव्ह आलेली व्यक्ती घरी येताच शेजाऱ्यांनी केले स्वागत