मुंबई: मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दरवर्षी १ हजारापेक्षा जास्त अंदाजे १ टक्के मृत्यू हे फुफ्फुसाचा आजारामुळे होतात. ज्यामध्ये श्वसन नलिका अरुंद होणे, श्र्वसनाचा त्रास होणे यासारख्या आजाराचा समावेश आहे. तीव्र ब्रॉन्कायलायटिससारख्या सामान्य छातीच्या संसर्गामुळे दरवर्षी २० हून अधिक मुलांचा मृत्यू होतो. मात्र ही आकडेवारी प्रदूषणाची तीव्रता दर्शवत नाही. ती मृत्यूची आकडेवारी आहे मृत्यूचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण बऱ्याच वेळा अचूक नसते असे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या.
प्रदूषण मृत्युमध्ये मुंबई पाचवी: ग्रीनपीस-दक्षिण एशिया या एनजीओने २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या वार्षिक मृत्यूंमध्ये मुंबई जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर आहे. २०२० मध्ये २५ हजार मृत्यू झाले. त्याच वर्षी वायू प्रदूषणामुळे दिल्लीत सर्वाधिक ५४ हजार मृत्यू झाले होते. व्यक्तीच्या मृत्यूचे अप्रत्यक्ष कारण वायू प्रदूषण आहे. या वर्षी वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. भारतातील एकूण मृत्यूंपैकी ८.७ टक्के मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे होतात. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आजार होतात. अस्थमा आणि सीओपीडी म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज यामुळे वारंवार संक्रमण होऊन समस्या निर्माण करते. सीओपीडी हा एक टाळता येण्याजोगा आजार मानला जातो जो वायू प्रदूषणामुळे बिघडतो.
अशी घ्या काळजी: सध्याच्या प्रदूषण आणि ऋतू बदलामुळे श्वसनाचे आजार असलेल्या आणि अस्थमा रुग्णांची संख्या वाढते आहे. थंडीत धूळ असलेली हवा खाली राहते. त्याचा परिणाम लहान मुले, धुळीची ऍलर्जी असलेल्या लोकांवर होतो. अस्थमा असलेल्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने त्यांना नेब्युलायझेशन देण्याची गरज पडत आहे. सकाळी थंडी असेल, धूकं पडले असेल अशावेळी अस्थमा व श्र्वसनाचा आजार असलेल्या लोकांनी मॉर्निंग वॉक करू नये. थोडे ऊन आल्यावर आणि हवा शुद्ध झाल्यावर मॉर्निंग वॉक करावी. सध्या कोविड नसला तरी धुळीचा त्रास ज्यांना आहे ते लोक मास्क घालत आहेत. ज्यांना अस्थमासारखे आजार आहेत त्या लोकांनी मास्क वापरावे, असे जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.