मुंबई - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे या समाजाच्या आरक्षणाच्या वाट्याला येणाऱ्या प्रवेशाचा प्रश्न अंधातरी असतानाच आज (शनिवारी) अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. यात अर्ज केलेल्या एकूण १ लाख ५८ हजार ८१० विद्यार्थ्यांपैकी ७६ हजार २३१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, तब्बल ७० हजार ८०२ जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.


वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशाची टक्केवारी वधारली -
पहिल्या पसंती क्रमानुसार २० हजार ३७१ तर दुसऱ्या पसंतीनुसार १२ हजार ३१५ विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. या दुसऱ्या गुणवत्ता यादीत चर्चगेट परिसरातील मुंबईतील एच.आर, के.सी.आणि रुईया महाविद्यालयांतील कला आणि वाणिज्य शाखेतील कटऑफ ९५ टक्क्यांहून अधिक वर पोहोचला आहे. विज्ञान शाखेतील प्रवेश मात्र ९० ते ९५ टक्केच्या दरम्यान राहिले आहेत. यानंतर माटुंगा येथील रूईया, डीजी रूपारेल महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान शाखेची कटऑफ ही ९० टक्केहून अधिक राहिली आहे. तर विलेपार्लेतील साठे महाविद्यालयात कला शाखेचे प्रवेश हे ८५ टक्के आणि त्या दरम्यान तर वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशाची टक्केवारी थोडी वधारली आहे.


हेही वाचा - दोन्ही 'राजे' भाजपाच्या प्रभावाखाली... मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यास संभाजी ब्रिगेड आग्रही
या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या पसंती क्रमानुसार निश्चित झालेले आहेत त्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये आजपासून ९ डिसेंबर या कालावधीत प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. जर प्रवेश घेतला नाही तर त्यांना पुढील फेऱ्यांमधून वगळले जाईल आणि अखेरीस विशेष फेरीतच त्यांना अर्ज करता येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितले.