मुंबई- शहराची लाईफ लाईन असलेल्या मुंबई लोकलचा प्रवास हा लोकांसाठी जीवघेणा ठरला आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. याचे कारण म्हणजे, गेल्या सहा वर्षात लोकल रेल्वेवर तब्बल ११८ दगडफेकीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी या संदर्भात आतापर्यंत केवळ २१ गुन्ह्यांची उकल केली आहे. या घटनांमध्ये आतापर्यंत तब्बल ११३ प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे.
यात महत्वाचे म्हणजे, दगडफेकीच्या सर्वाधिक घटना मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत या मार्गादरम्यान घडल्या आहे. यात सर्वाधिक ८४ वेळा दगडफेक होऊन ८१ प्रवासी आतापर्यंत जखमी झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात जीआरपीने केवळ १५ गुन्ह्यांचा तपास केला असून या प्रकरणी केवळ १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
लोकलवर होणाऱ्या दगडफेकीत दुसऱ्या स्थानावर हार्बर मार्ग आहे. यात पनवेल ते वडाळा दरम्यान दगडफेकीच्या २१ घटना घडल्या असून १८ प्रवासी जखमी झाले आहेत. या प्रकरणी जीआरपी पोलिसांनी केवळ ५ गुन्ह्यांचा तपास करीत ६ आरोपींनाच अटक केली आहे.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते पालघर या मार्गावर दगडफेकीच्या १३ घटना घडल्याचे माहितीत समोर आले आहे. या घटनांमध्ये १४ प्रवासी जखमी झाले तर केवळ एका गुन्ह्याची उकल करण्यात जीआरपी पोलिसांनी यश आले आहे. केवळ एका आरोपीला दगडफेकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
वर्षानुसार दगडफेकीच्या घटना व अटक झालेल्या आरोपींची संख्या
-२०१३ साली १६ दगडफेकीचे गुन्हे दाखल झाले होते. यात ३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली व ३ आरोपींना अटक झाली.
-२०१४ साली २१ दगडफेकीचे गुन्हे दाखल झाले होते. यात ४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली व ४ आरोपींना अटक झाली.
-२०१५ साली १६ दगडफेकीचे गुन्हे दाखल झाले होते. यात १ गुन्ह्यांची उकल करण्यात आली व १ आरोपीला अटक झाली.
-२०१६ साली १२ दगडफेकीचे गुन्हे दाखल झाले होते. यात ९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली व १ आरोपीला अटक झाली.
-२०१७ साली १५ दगडफेकीचे गुन्हे दाखल झाले होते. यात ४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली व ३ आरोपींना अटक झाली.
-२०१८ साली २७ दगडफेकीचे गुन्हे दाखल झाले होते. यात ४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली व ४ आरोपींना अटक झाली.
-२०१९ साली ११ दगडफेकीचे गुन्हे दाखल झाले होते. यात ४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली व ४ आरोपींना अटक झाली.