मुंबई - शालेय शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयासाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात असलेल्या विविध अल्पसंख्यंक महाविद्यालयांमध्ये 'इन हाऊस' कोट्यातील प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्यंक महाविद्यालयांनी आपल्या कोट्यातील पहिली गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर केली असून यात 'कटऑफ' गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे.
अल्पसंख्यंक कोट्यातील पहिल्या गुणवत्ता यादीत वाढलेला कटऑफ या महाविद्यालयांमध्ये रिक्त राहणाऱ्या जागांच्या प्रवेशासाठी इतर विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरणार आहे. सीबीएसई सोबतच राज्य शिक्षण मंडळाच्या ही दहावीच्या निकालात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अल्पसंख्यंक कोट्यातील पहिल्या गुणवत्ता यादीचा कटऑफ 85 टक्के इतका आहे. तो मागील वर्षी 84 टक्के आणि त्या दरम्यान होता.
यावेळी मुंबईत अल्पसंख्यंक महाविद्यालय असलेल्या मिठीबाई महाविद्यालयाचा कला शाखेचा कट ऑफ 81.7 टक्के पर्यंत येऊन पोहोचला आहे. गेल्या वर्षी केवळ तो 78.5 होता. कॉमप्युटर सायन्सचा कटऑफ 80 टक्के इतका आहे. तो गेल्या वर्षी केवळ 70 टक्के इतका होता. वांद्रे येथील सेंट अँड्रूज महाविद्यालयाचा कला शाखेचा कट ऑफही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढला असून त्यात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. तर विज्ञान शाखेच्या कट ऑफमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.
परिणामी मुंबईत अनेक नामांकित अल्पसंख्यंक महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्यंक विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांना अधीक गुण असतानाही त्यांना प्रवेश मिळणे कठीण होणार असल्याचे मत शिक्षण तज्ञाकडून व्यक्त केले जात आहे.
असे आहे अकरावीचे ऑनलाइन वेळापत्रक...
- 22 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन प्रवेशासाठी असलेला भाग दोन भरण्याचा कालावधी.
- ज्या विद्यार्थ्यांना भाग-1 भरता आला नाही त्यांनाही या दरम्यान दोन्ही भाग एकत्र भरता येऊ शकतील.
- अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली सामान्य गुणवत्ता यादी 23 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता जाहीर होणार आहे.
- 25 ऑगस्ट पर्यंत या यादीवर हरकती नोंदविण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 30 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जाहीर केली जाणार आहे.