मुंबई 100 Crore Fraud : आजकाल संपत्तीसाठी माणूस कोणत्या थराला जाईल, सांगता येत नाही. संपत्तीसाठी नात्यांचाही विसर पडतो. संपत्तीसाठी आई-वडील, बहीण, भाऊ तसंच अन्य नातेवाईकांच्या हत्या केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. दरम्यान, संपत्तीसाठी एका बहिणीनं आपल्या भावाला गंडवल्याची अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत घडलीय. या महिलेचं नाव अबिदा इस्माईल असून, तिनं नातेवाईक किंवा भावाला न विश्वासात घेता, त्यांना कोणतीही माहिती न देता 100 कोटींचा कारनामा केल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
पोलिसांत तक्रार दाखल : दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मध्य मुंबईतील असून, अबिदा इस्माईल या महिलेनं थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १०० कोटी रुपयांची मालमत्ता परस्पर विकल्यामुळं तिचे नातेवाईक व भावाला धक्का बसलाय. दरम्यान ही 100 कोटींची मालमत्ता या महिलेनं विकल्याचं लक्षात येताच या महिलेविरोधात तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळं पोलीस या महिलेचा शोध घेत होते.
महिलेला म्हैसूरमधून अटक : या महिलेच्या विरोधात मुंबईत पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला. तसंच देशातील अनेक भागात पोलिसांनी इतर पोलीस ठाण्यात मुंबईतील या धक्कादायक घटनेची माहिती दिली होती. यानंतर सगळीकडं पोलिसांचा शोध सुरु असताना, या महिलेला कर्नाटकच्या म्हैसूरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
"बऱ्याच दिवसांपूर्वी अबिदा इस्माईल या महिलेला म्हैसूरहून अटक करण्यात आली. सध्या ती भायखळा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे." - संग्राम सिंह निशाणदार, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा
- प्रकरण इओडब्ल्यूकडे : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या हे प्रकरण इकॉनमिक ऑफेन्स विंग (इओडब्ल्यू)कडे आहे. यंत्रणेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. या महिलेनं एवढं मोठं आणि टोकाचं पाऊल उचलण्याचं धाडस नेमकं का केलं याचीही माहिती घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
गुन्ह्या अंतर्गत या महिलेला 12 ऑक्टोबरला बेड्या - प्रकरणाचे तपास अधिकारी असुरकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, तक्रारदार अयाज कपाडिया हा जोगेश्वरीतील राहणारा आहे. कपाडिया यांचे पूर्वज हे पायधुनी येथे राहत होते. तर काही कपाडिया कुटुंबीय वांद्रे येथे राहत होते. लोअर परळ येथील दीपक सिनेमा नजीक असलेल्या दोन एकरवर चाळ आहे. ही कपाडिया यांच्या मालकीची चाळ आहे. डिलाईल रोड परिसरातदेखील तीन चाळी आहेत. अबिदा इस्माईल ही महिला लग्नानंतर कर्नाटकात स्थायिक झाल्यानंतर तिनेही परस्पर मालमत्ता विकल्याचा आरोप चुलत भावंडांनी केला. या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्या अंतर्गत या महिलेला 12 ऑक्टोबरला बेड्या ठोकण्यात आल्या. सध्या ही महिला न्यायालयीन कोठडीत असून संबंधित मालमत्तेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून स्टे देण्यात आला आहे.
हेही वाचा :