मुंबई - लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यामध्ये एक आगळावेगळा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. केवळ घर काम करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या महिलेला प्राप्तिकर विभागाची तब्बल 10 कोटी रुपयांची नोटीस आल्याची घटना घडली. नोटीस आल्यानंतर यासंदर्भात पिडीत महिलेने मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
चारुलता शहा, असे नोटीस आलेल्या महिलेचे नाव असून यांनी पंकज बोरा नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण मुंबईतील परिसरामध्ये ऑफिस काम व घरकाम करणाऱ्या चारुलता शहा या महिलेला गेल्या काही वर्षांपासून प्राप्तिकर विभागाची नोटीस येत होती. मात्र, याप्रकरणी सुरुवातीला चारुलता यांनी दुर्लक्ष केले. मात्र, 10 कोटी रुपयांची नोटीस विभागाकडून आल्यानंतर घाबरलेल्या चारुलता शहांनी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिली.
हेही वाचा - हेरगिरीप्रकरणी सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करावी - जयंत पाटील
पोलिसांनी तपास केला असता, चारुलता शहा या पंकज बोरा या व्यक्तीकडे काम करत असल्याचे समोर आले आहे. चारुलता यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे व इतर कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेऊन पंकज बोरा या आरोपीने चारुलता शहा यांच्या नावावर विविध बँकांमधून 2007 ते 2017 या दरम्यान करोडो रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, याबद्दल चारुलता शहा या पीडित महिलेला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. पण, प्राप्तिकर विभागाकडून तब्बल 10 कोटी रुपयांचा कर न भरल्याची नोटीस आल्यानंतर संशय आल्याने चारुलता शहा यांनी एलटी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणातील आरोपी पंकज बोरा हा फरार असून पोलीस आरोपी पंकज बोरा याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - संजय राऊत राज्यापालांच्या भेटीसाठी, काय होणार चर्चा?