मुंबई - मुंबईत गेल्या वर्षी 26 जानेवारीला जपानी मियावाकी पद्धतीने झाडांचे जंगल बनवण्याच्या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षभरात 64 पैकी 24 ठिकाणी तब्बल 1 लाख 62 हजार झाडे लावण्यात आली आहेत. त्यापैकी बहुतांश झाडांनी चार ते पाच फुटांची उंची गाठली असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.
वनांची योग्य प्रकारे वाढ
मुंबईत लोकसंख्येच्या प्रमाणात झाडांचे प्रमाण कमी असल्याने गेल्या वर्षी 26 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जपानी मियावाकी पद्धतीने म्हणजेच कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्याचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई महापालिकेने गेल्या वर्षभरात नियोजित केलेल्या 64 ठिकाणी मियावाकी पद्धतीने झाडे लावली. त्यापैकी 24 ठिकणी तब्बल 1 लाख 62 हजार 398 झाडे लावण्यात आली असून यापैकी बहुतांश झाडे चार ते पाच फुटांची उंच झाली आहेत. या झाडांच्या उंचीवरून वनांची योग्य प्रकारे वाढ होत असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाद्वारे दिली आहे. 24 वनांपैकी 4 वने ही सीएसआर फंडातून खासगी संस्थांच्या सहकार्याने बवण्यात आली आहेत.
काय आहे मियावाकी पद्धत
कोकणातील देवराई व सिंगापूर येथील अर्बन फॉरेस्टच्या प्रमाणेच कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावणारी मियावाकी ही वन बनवण्याची एक पद्धत आहे. मुंबईत कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी जपानी मियावाकी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. सुरुवातीला 2 ते 3 वर्षे या वनांची निगा राखावी लागते. त्यानंतर ही वने नैसर्गिकरित्या वाढतात. या मियावाकी जंगलात चिंच, पळस, करंज, साग, सिताफळ, बेल, पारिजातक, कडुलिंब, बांबू, पेरू, अशोक, खैर, जांभूळ, बदाम, काजू, फणस, आवळा आदी 47 प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. त्यात फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असलेली झाडे लावण्यात आली आहेत.
सर्वाधिक झाडे या ठिकाणी
सर्वाधिक 36 हजार 484 झाडे एम पूर्व विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या आयमॅक्स थिएटर जवळील भक्ती पार्क उद्यानाच्या भूखंडावर, 21 हजार 524 झाडे एल विभागातील भूखंडावर, तर 18 हजार 200 झाडे पी उत्तर विभागातील मालाड पश्चिम मनोरी गावालगतच्या भूखंडावर लावण्यात आली आहेत.