लातूर - जिल्ह्यात दुष्काळी चाहूल लागली आहे. त्यामुळे वन्यप्राणी अन्न व पाण्याच्या शोधत गावात प्रवेश करत असल्याच्या घटना घडत आहेत. अशाच एका काळविटास प्राणीमित्राने जीवदान दिले आहे. ही घटना औसा येथे घडली, या प्राणीमित्रांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा इथे धनगर गल्लीत चक्क मानवी वस्तीत काळवीट आल्याची घटना घडली. पाण्याच्या शोधात आलेल्या काळविटावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात काळवीट जखमी झाले. यावेळी कलेश्वर कांबळे, सोमनाथ कांबळे, मोहन पाटील, धनु ढाले यांच्या नजरेस हे सर्व दिसून आल्याने त्यांनी तत्काळ प्राणीमित्र सचिन क्षीरसागर यास याबाबतची माहिती दिली.
त्यावरून प्राणीमित्र सचिन व त्यांचे सहयोगी सूरज वेदपठाक व विकास पवार यांनी तातडीने जखमी काळविटास औसा येथील पशु वैद्यकीय चिकित्सालय येथील डॉ. कुंभारकर यांच्याशी संपर्क साधला व काळविटावर उपचार करून औसा येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले व निसर्ग अधिवासात सोडले.
हेही वाचा - लातूर जिल्ह्यात सर्वत्र गावबंदी, निलंग्यात 8 कोरोनाग्रस्त आढळल्याने खबरदारी