लातूर - औसा तालुक्यातील येळी गावातील अवैध दारु आणि मटक्याचा धंदा बंद करण्याच्या मागणीसाठी गावातील महिलांनी पोलीस उपअधीक्षक कार्यालयात ठिय्या दिला. अनेक संसार उध्वस्त होत असल्याने गावात कायमची दारूबंदी करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली.
येळी गावात जागोजागी दारूचे अड्डे आहेत. पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यासंदर्भात थेट पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी निवेदन दिले आहे. अवैध दारू, मटका तत्काळ बंद न झाल्यास मुलांसह आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - दारूबंदीसाठी महिलांचे 'स्वाक्षरी' आंदोलन; १३ गावातील शेकडो नागरिकांची उपस्थिती
काही दिवसांपूर्वी आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलीस अधीक्षकांना औसा मतदार संघातील अवैद्य धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. तरीही तालुक्यातील अवैध दारू, मटका, जुगार हे धंदे मोठ्या प्रमाणात सुरूच आहेत. दरम्यान, उपअधीक्षक नवले यांनी महिलांना लवकरात लवकर अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले आहे.