लातूर - औसा तालुक्यातील तपसे चिंचोली आणि लामजना येथील महिलांनी व तरुणांनी दारू विक्रेत्यांना चांगलाच चोप दिला आहे. अवैध दारू विक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने, ही भूमिका घेतली असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.
हेही वाचा - अखेर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे; प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे सक्तीच्या रजेवर
तालुक्यातील तपसे आणि लमजना या गावात मोठया प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते. वेळोवेळी आंदोलन आणि मोर्चे काढून ही दारूबंदी करण्याची मागणी बचत गटाच्या महिलांनी केली होती. मात्र, पोलिसांकडून तात्पुरती कारवाई केली जात असल्याने या महिला त्रस्त होत्या. त्यामुळे रुक्मिणी विठ्ठल येरनुळे आणि महिलांनी श्रीमंत पवार या दारू विक्रेत्याला चोप दिला. एवढेच नाही तर गावकऱ्यांनी दारूच्या बाटल्या फोडल्या. तसेच दारूच्या 62 बाटल्या जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिल्या.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या बाजूलाच; अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
यावेळी किल्लारी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे, उमाकांत चपटे यांच्यासह किल्लारी पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल होती. दरम्यान, किल्लारी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारी सर्व दारू दुकाने येत्या 3 दिवसांत बंद करण्याची हमी पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी दिली आहे.