लातूर - कोरोनामुळे ना आनंद व्यक्त करता येतोय, ना दुःख सांगता येतंय. त्यामुळे विवाह सोहळे देखील उंबऱ्याच्या आतमध्येच पार पडत आहेत. अशाच प्रकारचे आगळे वेगळे लग्न शिरूर अनंतपाळ येथे पार पडले. ना बँड बाजा, ना वऱ्हाडी मंडळी... मोजकेच पाहुणे आणि कोरोनाबद्दल जनजागृती करणारे फलक...अशा पद्धतीने धनंजय आणि अश्विनी यांचा विवाह सोहळा पार पडला.
सध्याच्या कोरोनाच्या लढाईत खरे योद्धे म्हणून लढत आहेत ते आरोग्य कर्मचारी आणि पोलीस अधिकारी. यापुढे जाऊन शिरूर अनंतपाळ येथील आरोग्य सेविका शांताबाई देवंगरे आणि आरोग्य सेवक राजेंद्र देवंगरे या दाम्पत्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. मुलगा धनंजय याचा विवाह चाकूर येथील मीनाताई राजकुमार दावणे यांच्या मुलीशी ठरला होता. 6 मेचा मुहूर्तही काढण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि विवाह कसा करावा असा प्रश्न वधू- वराच्या कुटुंबीयासमोर होता. मात्र, मुळातच आरोग्य यंत्रणेशी नाळ जुळलेल्या या देवंगरे कुटुंबीयांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत केवळ 15 व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा तर उरकलाच शिवाय लग्नसमारंभात कोरोनाबाबतच्या जनजागृतीचे फलक लावण्यात आले होते. एवढेच नाही तर अक्षदा ऐवजी प्रथम हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटाईजर, हॅन्डग्लोज आणि मास्कचे वाटप केले जात होते.
कोरोनाची लक्षणे आढळल्यास काय काळजी घ्यावी, तपासणी करण्याची प्रक्रिया काय? यासारख्या माहितीचे फलक लावण्यात आले होते. तसेच काळ कठीण आहे, मुलाचा लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडावा अशी अपेक्षा होती. मात्र, सध्याचे संकट आणि जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी या सर्वांचे भान ठेवत मुलगा धनंजय आणि मुलगी अश्विनी हिचा विवाह सोहळा घरीच पार पाडल्याचे राजेंद्र देवंगरे यांनी सांगितले.
कोरोनामुळे ओढवलेल्या परीस्थितीवर देवंगरे कुटुंबीयांनी केलेल्या आगळ्या- वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा शिरूर अनंतपाळ शहरात कौतुकाने होत आहे.