लातूर - पाणी टंचाई ही लातूरकारांच्या पाचवीलाच पुजलेली.. पण यंदा टंचाईच्या झळा कमी प्रमाणात आहेत. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात केवळ दोन टँकर सुरू आहेत. तर लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात 22 दलघमी पाणीसाठा असून ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच 239 गावातून 365 अधिग्रहणाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. मात्र, टंचाईची पाहणी करूनच जिल्हा प्रशासन अधिग्रहणाचे तसेच टँकर सुरू करण्याची परवानगी देत आहे. सद्यस्थितीला देवणी तालुक्यातील सय्यदपूर आणि चवन हिप्परगा येथेच टँकर सुरू आहेत. शिवाय 239 पैकी केवळ 169 गावात अधिग्रहणाला परवानगी देण्यात आली आहेत.
गतवर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे लातूरकरांचा पाणी प्रश्न काही प्रमाणात मिटला होता. लातूर शहराला सध्या 10 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. तर मांजरा धरणात 22 दलघमी पाणीसाठा असून ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल असा अंदाज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे.
अधिग्रहणाचे सर्वाधिक प्रस्ताव हे निलंगा तालुक्यातून दाखल झाले आहेत. मात्र, गावची लोकसंख्या, टंचाईची तीव्रता याची पाहणी करूनच प्रस्तावाला मंजुरी दिली जात आहे. यातच गेल्या आठवड्याभरात निलंगा, देवणी, सिरुर ताज्बंद तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून त्याचा देखील फायदा होऊ लागला आहे. दरवर्षीपेक्षा पाणीटंचाईच्या झळा कमी असल्या तरी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.