लातूर - घराच्या दारादारात जाऊन पैशाची आणि अन्नाची भीक मागितली जात असल्याचा प्रकार गौण आहे. मात्र, लातुरात चक्क पाण्याची भिक मागितली जात आहे. हे रुचत नसले तरी सत्य आहे. एका प्रतिष्ठानचे सदस्य हातामध्ये हांडा, कळशी घेऊन पाण्याची भिक मागत आहेत. तसेच हीच वेळ भविष्यात सर्वसामान्यांवर येऊ नये. यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याबाबत जनजागृती करीत आहेत. मात्र, त्यामागची दाहकता लातूरकरांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
यंदाच्या दुष्काळाच्या दाहकतेची तीव्रता दिवसागणीक वाढत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात विदारक चित्र आहे. शहरातही १० दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय २०१६ साली लातूरकरांना रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा ती वेळ आली नसली तरी पाण्याचे महत्त्व निदर्शनास आणून देण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने अनोख्या प्रकारे जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पाणीटंचाईच्या काळातही शहरातील अनेक ठिकाणी अपव्यय केला जातो. नेमकी हीच बाब पकडून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी येथील मोती नगर भागात पाण्याची भिक मागितली. त्याचबरोबर पाणी संवर्धनाचे धडेही दिले.
पाणीटंचाई बरोबरच पाण्याचा अपव्यय या दोन्ही बाबी कायम अशाच सुरू राहिल्या तर पाण्याची भिक मागण्याचा प्रसंग लातूरकरांवर ओढवेल, असा संदेश यामधून वसुंधरा प्रतिष्ठानला द्यावयाचा आहे. जिल्ह्यात ४५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर शहराला मांजरा धरणावरून १० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. हे धरणही मृतसाठ्यात असून लातूरकरांनी पाण्याचे नियोजन करणे काळाची गरज असल्याचा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी दिला आहे.