लातूर - दिवंगत विलासराव देशमुख हे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले होते. शिवाय केंद्रीय मंत्रीही होते. मात्र, त्या निधनाला 8 वर्ष उलटले तरी लातूरमध्ये त्यांचे स्मृतीभवन उभारण्यात आलेले नाही. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असताना याबाबतचा ठराव मंजूर झाला होता. त्यांनतर ही प्रक्रिया रखडली. 2017 साली जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आली. मात्र, काळाच्या ओघात स्मृतीभवनाचा विसर पडला आणि प्रास्तावित जागेत विज्ञान केंद्र उभारण्याच्या चर्चेला उधाण आले. त्यामुळे आजही संबंधित विभागाकडून तसे आदेश आले नाहीत.
गेल्या 6 वर्षांपासून दिवंगत विलासराव देशमुख यांचे स्मृतीभवन हे पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थान परिसरात होण्याचा प्रस्तावित आहे. दरम्यान, काँग्रेसच्या काळात या प्रस्तावाला तात्काळ मंजुरीही मिळाली होती. मात्र, 2017 साली जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आली हा विषय रखडला. यानंतर भाजपच्या काळात पुन्हा स्मृतीभवनाचा विषय सभागृहात चर्चेला आला. त्यावेळीही सभागृहात मंजुरी देण्यात आली आणि हा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला होता.
पालकमंत्री अमित देशमुख यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर बैठक-
परंतु, ना स्मृतीभवन झाले ना विज्ञान केंद्र, सद्यस्थितीला पंचायत समिती सभापतीच्या निवासस्थानी रंगरंगोटीचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी स्मृतीभवन उभारण्याच्या दृष्टीकोनातून पालकमंत्री अमित देशमुख यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर बैठक घेतली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाकडून हा प्रस्ताव सांस्कृतिक विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून आल्यानंतरच पुढची कार्यवाही होणार आहे. तर दुसरीकडे अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेकडे ग्रामविकास विभागाचे कसलेही पत्र आले नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले आहे. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख आणि ग्रामविकास हसन मुश्रीफ यांच्या बैठकीनंतर स्मृतीभावनाचा विषय चर्चेला आला असला तरी तो त्वरित मार्गी लागेल असे चित्र नाही.
स्मृतीभावनाला घेऊन अशा घडल्या घटना-
2016 साली जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती. दरम्यान, प्रतिभा पाटील अध्यक्ष असताना हा ठराव क्रमांक 3016 जुन्या पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानी जागेत विलासराव देशमुख स्मृती भवन करण्यात यावे असा मंजूर झाला होता. तर 2017 साली सत्ताबदल झाले. मिलिंद लातुरे हे भाजपचे अध्यक्ष असताना ठराव क्रमांक 3088 नुसार 3016 ह्या ठरावा ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. परंतु, काळाच्या ओघात या ठिकाणी विज्ञान केंद्र उभा करावे असा सूर उमटू लागला आणि स्मृतीभावनाचा प्रश्न रखडला.
हेही वाचा- अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश; शार्पशूटरने घातल्या गोळ्या
हेही वाचा- रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार - उदय सामंत