लातूर - आतापर्यंतच्या १४ लोकसभा निवडणुकांमध्ये लातूर मतदार संघात काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचेच वर्चस्व राहिले आहे. यंदा मात्र नव्याने स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे आव्हान या दोन्हीपक्षांसामोर आहे. वंचितासाठी एक नवा पर्याय म्हणून ही आघाडी कार्यरत आहे. जिल्ह्यात जातीय राजकारणाचे गणित मांडल्यास फक्त मत विभाजनासाठी नाहीतर एक पर्याय म्हणून या वंचित आघाडीकडे पाहिले जात आहे.
लातूर लोकसभा मतदार संघात अद्यापही काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांची नावे निश्चित झालेली नाहीत. दुसरीकडे काँग्रेसच्या आघाडीबाबाबत बिघाडी झाल्याने वंचित बहुजन आघाडीने राज्यात ३७ ठिकाणी उमेदवार जाहीर केले असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. गत निवडणुकीत केवळ २ ठिकाणी विजय मिळालेला काँग्रेस पक्ष हा राजकीय शत्रू होऊ शकत नसल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. राम गारकर यांनी आपली लढत ही भाजपबरोबर असल्याचे स्पष्ट केले. सक्षम उमेदवाराच्या शोधात असलेली काँग्रेस अद्यापही चलबिचल आहे. शिवाय वंचित आघाडीमुळे मतविभाजन होणार असल्याचा आरोप हा तथ्यहीन आहे. पक्षाचा स्वाभिमान आणि समाजातील प्रत्येक घटकाला पर्याय उपलब्ध व्हावा या अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी या पक्षाची स्थापना केली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन हा लढा सुरू असून पोकळ आश्वासनांना जनता कंटाळली आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांभोवती लक्ष केंद्रित करून निवडणुकीच्या आखाड्यात असल्याचे प्रा. राम गारकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यातील सर्व जातीधर्मातील जनतेला घेऊन हा लढा दिला जाणार आहे. त्याअनुषंगाने बैठका, सभा पार पडत असून एक सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर जात असल्याचेही ते म्हणाले.