लातूर - औसा तालुक्यातील सारोळा लामजना येथील रस्त्यालगत महादेववाडी गावाजवळ शेतामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३४ वर्ष असल्याची माहिती पोलीस शिपाई राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे. मृताची अद्याप ओळख पटलेली नसून त्याच्या अंगावर काळी पँट, पिवळा शर्ट आहे.
या व्यक्तीचा मृतदेह औसा पोलिसांनी ताब्यात घेतला असून उप जिल्हा रुग्णालय औसा येथे शवविच्छेदन केले आहे. शेतातील लहान पाण्याच्या डबक्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. मृत व्यक्तीच्या खिशात कसलाही ओळखीचा पुरावा अथवा वस्तू सापडल्या नाहीत. यावरून हे स्पष्ट होते की, या व्यक्तीचा खून करून महादेववाडी जवळच्या शेतात टाकला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
हेही वाचा - मुलींचे अश्लिल फोटो तयार करून ब्लॅकमेलींग करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अटक
दरम्यान, सोमवारी सहा वाजता या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह लातूर येथील जिल्हा रुग्णालयात ओळख पटेपर्यंत चार दिवस शीत पेटीत ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत औसा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.