लातूर - राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी लातूर जिल्हा आणि कर्नाटकच्या सीमेवरील भागात अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. वरुणराजाची कृपादृष्टी व्हावी या उद्देशाने हुलसूर गावात महिलांनी एकत्र येत बाहुला-बाहुलीचे लग्न लावले आहे. यामुळे वरुणराजा प्रसन्न होतो आणि पाऊस पडतो, अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे पावसाच्या आशेपोटी धूम धडाक्यात बाहुला-बाहुलीचा विवाह सोहळा हुलसूर गावात पार पडला.
राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी लातूर जिल्हा आणि कर्नाटक सीमावर्ती भागात अद्यापही पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे चिंतातूर शेतकऱ्यांनी दरवर्षीची परंपरा कायम ठेवत यंदाही बाहुला-बाहुलीचा लग्न सोहळा पार पाडला. आर्थिक संकट असतानाही या भागातील नागरिकांनी उत्साहात या सोहळ्यात सहभाग नोंदवला. यासाठी मांडव सजवाला जातो. मांडवात मंगल अष्टक होतात, त्यानंतर वाजत गाजत गावातील मंदिराला नवरा-नवरीला नेले जाते, एवढेच नाहीतर सर्व गावाला जेवन दिले जाते.
पाऊस पडला नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावातील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. अशा पद्धतीने बाहुला बाहुलीचे लग्न केल्याने पाऊस पडतो व गावात सुख-समाधान नांदते, अशी धारणा येथील गावकऱ्यांची आहे.