लातूर - संबंध राज्यात रविवारी भाजपच्यावतीने दुचाकीवरून विजयी संकल्प रॅली काढण्यात आली. लातुरातही प्रत्येक विधानसभा मतदार संघात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकऱ्यांनी ही दुचाकी रॅली काढली. मात्र, पालकमंत्र्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच हेल्मेट न घालता हा प्रताप केला. त्यामुळे शहराबाहेर उभा राहून सर्वसामान्य वाहतूकदारांवर कारवाई करणारे पोलीस या भाजपच्या नेत्यांवर कारवाई करणार का? असा सवाल सामान्य नागरिकांमधून केला जात आहे.
रविवारच्या दुचाकी रॅलींनी जिल्ह्यातील चार विधासभा मतदार संघातील वातावरण ढवळून निघाले. कार्यकर्त्यांसमवेत मंत्री, खासदार आणि आमदारांचाही उत्साह दुणावला होता. मात्र, या उत्साहाच्या भरात वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वातावरण भाजपयमय करण्यात लोकप्रतिनीधी व्यस्त होते. लातूर शहरातील रॅलीमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड हे दुचाकीवर स्वार झाले होते. तर लातूर ग्रामीणमध्ये भाजप नेते रमेश आप्पा कराड हे सहभागी झाले होते.
दुचाकी रॅलीच्या निमित्ताने इच्छूक उमेदवारांनी विधानसभा मतदार संघ पिंजून काढला. शिवाय नेते, लोकप्रतिनीधी यांनी रॅली अधिक भारदस्त होण्यासाठी बुलेटचा वापर केला होता. यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष वेधले असले तरी पोलिसांचेही लक्ष असणे अपेक्षित होते. इतर वेळी दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना क्षुल्लक कारणांवरून वेठीस धरणारे पोलीस रॅली दरम्यान कुठे बेपत्ता झाले असा सवाल उपस्थित होत आहे.
यासंदर्भात साधी दखलही घेण्यात आली नाही. त्यामुळे भाजप नेत्यांच्या गैरपक्राराबद्दल कारवाई होणार का नाही याबाबत संभ्रमता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या रॅलीस हेल्मेट घालून सहभागी झाले होते. हेच तात्पर्य जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी दाखविले नाही. पोलीस दोषींवर कारवाई करतील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.