निलंगा(लातूर)- निलंगा शहरासह तालुक्यातील विविध भागात मंगळवारी 21 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसात तालुक्यातील गुराळ येथील शेतकरी दिगंबर माधव माने यांच्या शेतात दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वीज पडून 1 बैल, 1 गाय आणि 1 कालवड दगावली आहे. तिच्याजवळ उभा असलेला श्रीहरी भागवत रुपणर (15 वर्ष) या मुलाला विजेचा झटका लागल्याने तो बेशुद्ध पडला, त्याला तात्काळ निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कमलाकर म्हेत्रे यांनी माहिती दिली.
विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या मुलची प्रकृती ठीक असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे यांनी सांगितले. दरम्यान, हा पाऊस अंबुलगा बुलांबोटा, झरी, गुराळ, सावनगीरा, सिंदखेड यासह आदी भागात झाला. अनेक शेतकऱ्यांच्या फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जनावरांच्या चारा वारा आणि वादळाने रानावर उडून गेल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
शेतात बांधलेली तीन जनावरे वीज पडून जागीच ठार झालेल्या शेतकऱ्याचे अंदाजे एक लाख पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. सदरील शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.