लातूर - जिल्ह्यात चोरीची घटना समोर आली आहे. उदगीर शहरालगत असलेल्या बनशेळकी तलावाजवळ राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून लुटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बनशेळकी तलाव शेजारी सुभाष नेत्रागावकर (78) हे आपल्या पत्नीसह राहतात. गुरुवारी रात्री दोन अज्ञात बुरखाधारी चोरट्यांनी घरात प्रवेश केला. एवढेच नाही तर सुभाष नेत्रागावकर यांच्या गळ्याला चाकू लावला व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठण, हातातील 5 तोळ्याच्या पाटल्या असा एकूण 4 लाख 50 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी नेत्रागावकर यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. उदगीर शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव हे उदगीरमध्येच ठाण मांडून आहेत. शुक्रवारी सकाळी लातूर येथून श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा मागोवा सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक सिंगणकर यांच्याकडे तपास करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी उदगीर शहरात तर गुरुवारी शहरालगतच्या भागात चोरीच्या घटना झाल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी घेतला होता आढावा
नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी उदगीर शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचा आढावा घेतला होता. अशातच दोन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे घटनांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक हे उदगीर हद्दीतच तळ ठोकून आहेत.
घरातच दबा धरून बसले होते चोर -
शहरलगतच नेत्रागावकर दाम्पत्य राहत असल्याने रात्री 8 वाजले की घराचे गेट लावून घेत असत. नेहमीप्रमाणे प्रभावती नेत्रागावकर यांनी मुख्य गेटला कुलूप लावले पण दरवाजा लावत असतानाच हॉलमध्ये दबा धरून बसलेल्या दोन बुरखाधारी चोरट्यांनी प्रभावती व त्यांच्या पतीला चाकूचा धाक दाखवून सर्व सोने लुटले.
अवघ्या 5 मिनिटांमध्ये लुटले 9 तोळे सोने -
घरातील हॉलमध्ये दोन चोरांना पाहून प्रभावती यांनी आरडाओरड केली. याच दरम्यान, त्यांचे पती सुभाष नेत्रागावकर हेदेखील हॉलमध्ये आले. मात्र, चोरट्यांनी सुभाष यांना चाकूचा धाक दाखविला आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये प्रभावती यांच्याजवळील सोने लुटले.
औसा तालुक्यात ४ नोव्हेंबरला झाली चोरी -
औसा तालुक्यातील उजनी गावात मंगळवारी रात्री उशिरा एका शिक्षकाचा घरी चोरी झाल्याची घटना घडली. चाकूचा धाक दाखवून घरात घुसलेल्या 5 चोरट्यांनी 1 लाख 25 हजार रुपये रोख रक्कम तसेच दोन तोळे सोने व इतर साहित्याची चोरी केली आहे. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.