लातूर - भरदिवसा घरफोडी करत चोरट्यांनी सोन्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. ही घटना देवणी तालुक्यातील वलांडी येथे घडली. यात चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांची चोरी केली.
वलांडी येथील जुन्या पोलीस चौकीलगत शिवशंकर काशिनाथ महाजन यांचे घर आहे. शुक्रवारी शिवशंकर महाजन आणि त्यांच्या पत्नी गावी गेले होते. सांयकाळी पाच वाजता ते घरी परतल्यानंतर घराचे कुलुप काढल्यानंतर दरवाजा आतमधून बंद असल्याने उघडत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी नातलगांसह शेजाऱ्यांना सोबत घेत घराच्या मागच्या बाजूने आतमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्या घरातील सर्वच साहित्य अस्ताव्यस्त आणि विखरलेले होते. स्वयंपाकघरातील साहित्यात ठेवलेले 10 तोळे सोन्याचे दागिने, 5 तोळे चांदीचे दागिने आणि कपाटातील रोख 25 हजार रुपये रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले. स्वयंपाकघरातील सर्व साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त करत दोन्ही माळ्यावर असलेली कपाटे फोडलेली दिसली. यावरून चोरटे बराच वेळ घरात तळ ठोकून होते.
हेही वाचा - पाथरीकरांना मुंबईचे निमंत्रणच नाही; मंगळवारच्या बैठकीत पुढील आंदोलनाचा निर्णय होणार
वलांडीचा आठवडी बाजाराची प्रचंड वर्दळ असताना भरवस्तीत धाडसी चोरी झाल्याने गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर पोलीस दाखल झाले घटनास्थळी हजर झाले. मुरली दंतराव यांनी पंचनामा केला. यासंदरभात देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी 22 दिवसांआधी संगमेश्वर बिरादार या व्यक्तीच्या घरी अशीच चोरी झाली होती. आता एका महिन्याच्या आतच पुन्हा असे धाडस चोरट्यांनी केले आहे. यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांचे आवाहन आहे.