निलंगा (लातूर) - शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले आठ रुग्ण सापडले. त्यानंतर शहरातील काही भागात १७ एप्रिलपर्यंत रेड अलर्ट लावण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यात येत आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे स्वतः नागरिकांना सेवा देत कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यापासून नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी शहरात अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या. लॉकडाऊन पुर्वीच शहरातील सर्व मंगलसेवा बंद करण्याचे काम त्यांनी केले. लॉकडाऊन नंतर शहरातील सर्वच रस्त्यावर बॅरीगेट बसवुन रस्त्यात अडथळे निर्माण केले. निलंगा शहरात नगरपालिका व पोलीस प्रशासन चोख खबरदारी घेत असतानाच ३ एप्रिलला शहरातील एका धार्मिक स्थळी परराज्यातून आलेले नागरीक असल्याची माहिती नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पावले उचलत पोलीस व आरोग्य विभागाच्या मार्फत त्यांना ताब्यात घेतले. तपासणीनंतर त्यापैकी आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली.
तात्काळ शहरातील औरंगपुरा, निळकंठेश्वर मार्केट, दत्त नगर, शिवाजी नगरचा काही भाग रेड अलर्ट जाहीर करत संपूर्ण शहर तीन दिवस लॉकडाऊन करण्यात आले. रेड अलर्ट भाग १७ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्याने निलंगा नगरपालिकेने त्या भागातील नागरिकांना जिवनाश्यक सेवा घरपोच देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. शहरात जनजागरण, निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्यासाठी अनेक कर्मचारी गुंतून आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून स्वतः नगराध्यक्ष शिंगाडे अत्यावश्यक सेवा पुरवताना दिसत आहेत. सोबतच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गरज वाटेल तेव्हा प्रशासनाला आवश्यक सुचना देण्याबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करताना दिसत आहेत.