लातूर - राज्यात गुटखा बंदी असतानाही गुटख्यासाठी किती आटापिटा होत असते याचा प्रत्यय बुधवारी पहाटे समोर आला आहे. लातूरहून बार्शीकडे मार्गस्थ होत असलेल्या टेम्पोत गुटखा असल्याची माहिती मिळताच तिघाजणांनी आधी टेम्पो चालकासह एकाचे अपहरण केले व नंतर टेम्पोला लातूर तालुक्यातील दगडवाडी येथे मार्गस्थ केले. याबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांसह अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
बुधवारी पहाटे लातूर-बार्शी या राज्यमार्गावरून आयशर टेम्पो हा गुटखा घेऊन बार्शीकडे मार्गस्थ होत होता. दरम्यान हरंगूळ रेल्वे स्टेशनजवळ टेम्पो क्र. (एम.एच.२५ यु.१२२७) आला असता दगडवाडी येथील तिघाजणांनी त्यातील गुटखा घेण्याच्या उद्देशाने चालक रसूल इनामदार व अन्य एकाला ताब्यात घेतले. त्यानंतर या तिघांनी टेम्पोची रवानगी थेट दगडवाडी येथे केली. संबंधित घटनेची पोलिसांना महिती मिळताच अपहरणकर्ते नितीन जाधव (शिर्षि-धानोरा), सोमनाथ आंग्रे (मोतीनगर, लातूर), अमोल राठोड या तिघांना पोलसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवाय, अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी टेम्पो चालकालाही ताब्यात घेतले आहे. आंध्रप्रदेश येथून २३ लाख रुपयांचा गुटखा वाहतूक केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अवैध गुटख्यावर अपहरणकर्त्यांची नजर आणि अपहरणकर्त्यांवर पोलिसांची नजर, असाच काहीसा हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
हेही वाचा- राजकीय चर्चा गेली हमरीतुमरीवर, चावा घेऊन तोडला मित्राचा कान