लातूर- पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून मोठया प्रमाणात नागरिक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर लातूर येथून शुक्रवारी सर्व साहित्य घेऊन पोलीस विभागातील एक तसेच मुख्य अग्निशमन दलातील एक अशी दोन पथके सांगलीला रवाना झाली आहेत. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या आदेशावरून ही पथके रवाना झाली आहेत.
उदगीर अग्निशमन विभागाचे एकूण आठ आणि अहमदपूर अग्निशमन विभागाचे एकूण दोन कर्मचारी तसेच जिल्हा शोध व बचाव पथकातील पोलीस विभागातून नियुक्त दोन कर्मचाऱ्यांची शोध व बचाव कार्यासाठी निवड करण्यात आली आहे. हे पथक अण्य आवश्यक साहित्यांसह पोलीस विभागाच्या वाहनाने सांगलीकडे रवाना झाले असून ते शनिवारी पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत सांगलीत पोहोचणार आहे. या पथकाने आल्टे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अधिपत्याखाली शोध व बचाव कार्य करावे असे निर्देश, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. या बचाव पथकात २ बोटींसह १२ जणांचा समावेश आहे.