लातूर - जिल्ह्यातील उदगीर शहरालगत असलेल्या हैबतपूर येथे आर्थिक व्यवहारातून सोमवारी मारहाण झाली होती. या घटनेत एका 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यांनंतर उदगीरमध्ये हिंसाचार उसळला, दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये अनेक जण जखमी झाले होते. मात्र या तरुणाच्या मृत्यूचा आणि दगडफेकीचा संबंध नसून, सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे ही घटना घडली असल्याचा दावा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
उदगीर परिसरात असलेल्या हैबतपूरमध्ये आर्थिक देवाण-घेवाणीमधून झालेल्या मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता.शफी अहमद सय्यद (34) असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केली होती. आणि त्याचदरम्यान उदगीरमध्ये दगडफेक सूरू झाल्याने, संतप्त नातेवाईकांडून ही दगडफेक करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र या मारहाणीच्या घटनेचा आणि दगडफेकीचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान समाज माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.