लातूर - उद्योग-व्यवसायांना चालना मिळावी यादृष्टीने सध्याच्या लॉकडाऊनमध्ये काही व्यावसायिक आणि उद्योजकांना सूट देण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन कायम होते. परंतु दीड महिन्यानंतर हाताला काम मिळणार या उद्देशाने शेकडो कामगार बाजार समितीत दाखल झाले होते. याठिकाणी पोलीस असतानाही सोशल डिस्टन्सचा फज्जा अशी अवस्था निर्माण झाली होती. त्यामूळे शिथिलता असली तरी नियमांचे पालन करण्याचे आवाहन कायम आहे.
सोमवारपासून शेतीसंबंधीची कामे, मत्स्य व्यवसाय, दुग्धव्यवसाय, बँका, पतसंस्था, बांधकाम व्यवसाय, अनाथालये, वृद्धाश्रम यासारख्या बाबी सुरू झाल्या आहेत. लातूर शहरातील एमआयडीसी ही आज सुरू होणार होती. परंतु जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सुरू करू नये, आशा सूचना केल्या आहेत. त्यानुळे महानगरपालिका हद्दीतील औद्योगिक भवन परिसर हा बंदच राहणार आहे. दुसरीकडे बांधकाम व्यवसाय सुरू होणार असल्याने मजुरांनी गर्दी केली होती. त्यामुळे शिवाजी चौक आणि गंजगोलाई या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे तीन -तेरा वाजले असल्याचे पाहवयास मिळाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही शेतकऱ्यांनी पहिल्या दिवशी गर्दी केली होती. मात्र, ठरवून दिलेल्या नियमावली प्रमाणे शेतीमाल घेतला जात होता. त्यामुळे लातूर जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरी सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे तेवढेच गरजेचे आहे.