लातूर- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. त्या कार्यक्रमात सहभागी झालेले बाहेरील 12 नागरिक लातुरात आले. त्यातील 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे निलंग्यात तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, त्यांतर सुरू झालेल्या निलंगा शहरात जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत मोठी गर्दी केली. गॅस वितरणाच्या ठिकाणी तर नियोजनाच्या अभावामुळे एकच गोंधळ पहायला मिळाला.
हेही वाचा- बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही नाती कोरोनाग्रस्त; शहरात एकूण संख्या 6वर
३ एप्रिलला निलंगा शहरात सापडलेले १२ परप्रांतीयंंपैकी ८ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तत्काळ उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी तीन दिवसासाठी संपूर्ण शहर लाॅकडाऊन करत शहराच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी आठ ते ११ वाजण्याच्या दरम्यानचा वेळ ठेवण्यात आला होता. त्याअनुषंगाने नागरिकांनी भाजीपाला, किराणा, पेट्रोल अशी खरेदी करण्यासाठी शहरात एकच गर्दी केली होती.
प्रशासनाने आखून दिलेले सोशल डिस्टन्सिंगचा नागरिकांना विसर पडला होता. गॅस वितरण शहरात घरपोच करणे बंधनकारक असताना, वितरकांकडून ऐन अडचणीच्या काळात घरपोच सेवा बंद करण्यात आल्याने शहरातील शिवाजी गॅस एजन्सीसमोर नागरिकांनी तोबा गर्दी केली. त्या ठिकाणी नागरिकांना ठराविक अंतरावर उभा टाकण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला.
नियमानुसार गॅस वितरण हे शहराबाहेर करणे गरजेचे असताना, शहरातील उच्चभ्रू वस्तीत गॅस वितरण करण्यात येत असल्याने यापूर्वीही अनेकदा नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, त्याची दखल कोणीच घेतलेली नाही. सध्याच्या तरी परिस्थितीत वितरण शहराबाहेर व्हावे, अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, त्या पाॅझिटिव्ह रुग्णांपैकी तिघांचा वैद्यकीय अहवाल फेरतपासणीत निगेटिव्ह आला आहे. तर एकाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.